औरंगाबाद : महापालिकेने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरणाची तयारी सुरु केली आहे. जानेवारीत लसीकरण सुरु होण्याची शक्यता पालिकेच्या आरोग्य विभागाने वर्तविली आहे. २८ दिवसांच्या अंतराने लसीच्या दोन मात्रा दिल्या जाणार आहेत. चार टप्प्यांत लसीकरण केले जाणार असून, पालिकेच्या आरोग्य केंद्रात ज्यांनी नोंदणी केली आहे त्यांनाच लस दिली जाणार आहे.
मनपा आरोग्य विभागाची गुरुवारी बैठक झाली. या बैठकीनंतर आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी लसीकरण कार्यक्रमाबाबत सांगितले, लसीकरणाच्या अनुषंगाने पालिकेने तयारी सुरु केली आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सध्या चार प्रकारच्या लसींबद्दल शासनस्तरावर चर्चा सुरु आहे, यापैकी कोणती लस शासनाकडून उपलब्ध करुन दिली जाणार आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे डॉ. पाडळकर म्हणाल्या.
लसींसाठी दोन ते आठ अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते. लसीकरणासाठी मनपा स्वत:च्या कर्मचाऱ्यांसह खासगी क्षेत्रातील मनुष्यबळ घेणार आहे. त्यात शिक्षण , पोलीस , अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. लसीकरणासाठी लवकरच कार्यशाळा होणार आहे.