औरंगाबाद : जिल्ह्यात १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येणार आहे; परंतु लसींचा साठा अत्यल्प असल्याने लसीकरणाला खोडा बसण्याची भीती व्यक्त होत होती. आरोग्य उपसंचालक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी बुधवारी थेट पुणे गाठून तब्बल १ लाख ९२ हजार लसींचा साठा मिळविला.
आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स, ६० वर्षांवरील नागरिक आणि व्याधी असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांना आतापर्यंत लस देण्यात येत होती; मात्र आता गुरुवारपासून ४५ वर्षांवरील सर्वांना लस दिली जाणार आहे. या वयोगटातील किमान ५ लाख लोकांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे; परंतु गेल्या काही दिवसांपासून लसींची नुसती प्रतीक्षाच करावी लागत होती. शहरात दररोज २ हजार नागरिकांना लस देण्यात येत आहे; परंतु महापालिकेकडे केवळ ४ हजार लसींचा साठा उपलब्ध आहे. हा साठा दोन दिवस पुरेल एवढाच आहे. लसींचा पुरवठा न झाल्यास दोन दिवसांनंतर लसीकरणाची मेगा मोहीम संकटात सापडण्याची भीती होती; पण या मोहिमेच्या एक दिवसआधी लसी मिळाल्या. या लसी सकाळपर्यंत शहरात दाखल होणार आहेत. फार्मासिस्ट संजय भिवसने यांनी लसी आणण्यासाठी परिश्रम घेतले. आरोग्य उपसंचालक कार्यालयास १ लाख ९२ हजार लसीचे डोस मिळाले आहेत, अशी माहिती आरोग्य उपसंचालक डाॅ. स्वप्नील लाळे यांनी दिली.