औरंगाबाद : जिल्ह्यातील जे नागरिक कोरोना प्रतिबंधक लसीच्या दुसऱ्या डोससाठी पात्र आहेत, परंतु त्यांनी अद्याप दुसरा डोस घेतलेला नाही अशा नागरिकांनी १५ डिसेंबरपर्यंत दुसरा डोस पूर्ण करावा. अन्यथा शासकीय पर्याय वापरून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी गुरुवारी दिला.
महाविद्यालय, कोचिंग क्लासेसमधील ज्या शिक्षकांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत, त्या शिक्षकांनी महिन्यातून एकदा आणि ज्यांनी लस घेतलेली नाही अशा शिक्षकांनी प्रत्येक आठवड्याला कोरोना चाचणी करणे बंधनकारक असेल. लसीकरणासाठी मोबाइल व्हॅन पथकांची स्थापना करण्यात येणार. हे पथक मागणीप्रमाणे घरोघरी जाऊन नागरिकांचे लसीकरण करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीत जि.प. अध्यक्षा मीना शेळके, पालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय, पोलीस उपायुक्त उज्ज्वला वनकर, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, डॉ. प्रदीप कुलकर्णी आदी अधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी म्हणाले, ओमायक्रॉन संसर्ग रोखण्यासाठी पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींची दरमहा, लसीकरणाचा एक डोस घेतलेल्या व्यक्तींची प्रत्येक १५ दिवसाला व लसीकरणाची एकही मात्रा न घेतलेल्या व्यक्तींची प्रत्येक आठवड्याला आरटीपीसीआर तपासणी करण्यात यावी. तसेच लसीकरण मोहिमेत कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर संबंधित विभागप्रमुखांनी कारवाई करावी.
...तर महाविद्यालयांत देऊ नका प्रवेशमहाविद्यालयांनी त्यांचे प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले आहे, याबाबतची खात्री करावी. लसीचा एकही डोस न घेतलेल्या विद्यार्थी-शिक्षकांना तसेच दुसऱ्या डोससाठी पात्र असूनही न घेतलेल्या विद्यार्थी, शिक्षकांना महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यात येऊ नये, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
लसीकरण केलेले असेल तरच फॉर्म घ्यासर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे कोणतेही फॉर्म (परीक्षा, विद्यावेतन, प्रवेश) भरण्यापूर्वी त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली असल्याबाबतची खात्री करावी. सर्व महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या अनुषंगाने तपासणी करण्यात यावी. तपासणी शिबिरांच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त पुरविण्यात यावा, असे आदेश बैठकीत देण्यात आले.