औरंगाबाद : कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी १६ जानेवारीस लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्याच्या लसीकरणासाठी २६८ बुथ तयार केले जाणार आहेत. या बुथवर १६६९ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. जिल्ह्याला ३८ हजार लसींचे डोस मिळण्याची शक्यता असल्याचे जि. प. लसीकरण अधिकारी डॉ. विजय वाघ यांनी सांगितले.
लसीकरणासाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. पहिल्या टप्प्यात लसीकरणासाठी ३७ हजारांवर नोंदणी पोहोचली आहे. या कर्मचाऱ्यांचे लसीकरणविषयीचे प्रशिक्षणही पूर्ण झाल्याचे डॉ. वाघ यांनी सांगितले. आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी अॅपमध्ये करण्यात आली आहे. यामध्ये १३ हजार ग्रामीण भागातील, तर २४ हजार शहरी भागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. लसीकरणाच्या दिवसापर्यंत नोंदणी सुरू राहणार आहे.
ग्रामीणमध्ये १५०, शहरी भागात ११८ बुथलसीकरणासाठी एकूण २७० लसीकरण बुथ तयार केले आहेत. यामध्ये ग्रामीण भागात १५०, तर शहरी भागात ११८ बुथचा समावेश आहे. प्रत्येक लसीकरण बुथवर सहा कर्मचाऱ्यांप्रमाणे ग्रामीण भागात ९०० आणि शहरी भागात ७७९ कर्मचारी नियुक्त होतील.