औरंगाबाद : ‘तुम्ही कोणती लस घेतली, आम्ही काेव्हॅक्सिन घेतली, मग खरंच देशाबाहेर जाता येणार नाही का’ असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कारण औरंगाबादेत आतापर्यंत काेव्हॅक्सिन लसीचे ३२ हजार डोस नागरिकांना देण्यात आले आहेत. त्यामुळे देशभरातील नागरिकांप्रमाणे औरंगाबादकरांनाही परदेश दौरा मुकण्याची सध्या चिंता सतावत आहे.
औरंगाबादेत सुरुवातीपासूनच काेव्हॅक्सिन लसीचा पुरवठा कमी राहिला. प्रारंभी आरोग्य कर्मचाऱ्यांनाच ही लस देण्यात आली. त्यानंतर नागरिकांसाठीही लस उपलब्ध झाली. ही लस घेण्यास अनेकांनी प्राधान्यक्रम दिला. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे साडेपाच लाख डोस देण्यात आले. यात औरंगाबादेत ३२ हजार डोसचे वितरण झालेले आहे. कोरोनामुळे विमान प्रवासावर, आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी अनेक निर्बंध, नियम लावण्यात येत आहेत. औरंगाबादहून पर्यटन, उद्योग-व्यवसायानिमित्त परदेशात जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच अनेकांचे परदेशात जाण्याचे नियोजन आहे. परंतु काेव्हॅक्सिन घेतल्यामुळे त्यात अडचण येण्याची चिंता अनेकांना सतावत आहे.
जगभरातील बहुतांश देश जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीत समाविष्ट लस घेतलेल्या लोकांनाच व्हिसा देत आहे. या व्हिसासाठी लस घेतल्याचे प्रमाणपत्र अनेक देशांनी बंधनकारक केले आहे. या यादीत अनेक लसींचा समावेश आहे. परंतु भारत बायोटेकच्या काेव्हॅक्सिनचा समावेश नाही. यासंदर्भात आढावा घेतल्यानंतर जूनमध्ये जागतिक आरोग्य संघटनेकडून निर्णय होणार असल्याचे सांगण्यात येते. यावर केंद्र सरकारने स्पष्टीकरण देत आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट हा सध्या प्रवासाचा आधार आहे. व्हॅक्सिन पासपोर्टबाबत जागतिक आरोग्य संघटनेचे अद्याप एकमत झाले नसल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले. त्यामुळे काेव्हॅक्सिन घेतलेल्यांसंदर्भात परदेश दौऱ्यासाठी काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काहीही गाईडलाईन नाहीतजिल्ह्यात जानेवारीपासून तर २२ मेपर्यंत पहिला आणि दुसरा असे ५ लाख ५१ हजार ९ डोस देण्यात आले आहेत. यात तब्बल ४ लाख २४ हजार ६९७ जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर १ लाख २६ हजार ३१२ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. काेव्हॅक्सिन घेतलेल्यांना परदेश दौरा करता येणार नाही, यासंदर्भात काहीही गाईडलाईन प्राप्त नसल्याचे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. नीता पाडळकर यांनी सांगितले.