औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शहरात लसीकरण माेहीम राबविण्यात येत आहेत. त्यासाठी मनपाने शासनाकडे १ लाख लस डोसची मागणी केली होती. सोमवारी ३० हजार लसचे डोस प्राप्त झाले आहेत. पाच दिवस पुरेल एवढा साठा मनपाकडे उपलब्ध आहे. त्यामुळे लसीकरण मोहीम कायम ठेऊन यात एनजीओ, संस्थांची मदत घेण्यात येणार असल्याचे मनपा आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.
केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला पुरेशा प्रमाणात देण्यात येत नाही. त्यामुळे राज्यात काेरोना लसींचा तुटवडा असल्याने शहरातही चार दिवसांपासून मागणी करूनही लसींचा पुरवठा करण्यात आला नाही. त्यात मनपाने ५ एप्रिलपासून मेगा लसीकरण मोहीम सुरू केली आहे तसेच रविवारपासून शासनाने लसीकरण मोहिमेचा महोत्सव सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. अशा स्थितीत मनपाकडून पूर्ण शहरातील ११५ वॉर्डात १२१ लसीकरण बुथ तयार करून तेथे लसीकरण सुरू केले आहेत. नेहमीपेक्षा आता तेथे लसीकरणास चांगला प्रतिसाद मिळत आहेत. त्यात शनिवारी ७,३६७ जणांनी लसींचा डोस घेतला आहे. त्यात आणखी वेग वाढणार असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
अशा परिस्थिती शासनाकडून सोमवारी ३० हजार लसीचे डोस मिळाले असून चार दिवस पुरेल एवढा साठा झाला आहे. मनपाकडून राबविण्यात येत असलेल्या मोहिमेसाठी शासनाकडून लस मिळाल्यास लसीकरण वाढविण्यासाठी शहरातील लसीकरण आणि एनजीओंची मदत घेण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वांना आवाहन करण्यात आले आहे. आतापर्यंत नगरसेवक आणि स्थानिक काही संस्था, व्यक्तींनी मदत केली.