औरंगाबाद : शहराला दररोज वीस हजार लसची गरज असताना शासनाकडून आठवड्यातून एकदा किंवा दोनदा चार ते पाच हजार लस साठा देण्यात येत आहे. मुंबई महापालिकेच्या धर्तीवर औरंगाबाद महापालिका ही लस खरेदीसाठी ग्लोबल टेंडर काढू शकते. त्यासाठी पंचवीस कोटी रुपयांचा खर्च आला तरी निधीची अडचण भासणार नाही, अशी भूमिका महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी घेतली आहे.
शहरातील ७० टक्के लोकसंख्येचे लसीकरण झाल्याशिवाय शहर कोरोनापासून सुरक्षित होणार नाही. शहरातील काही झोनमध्ये लसीकरणाला प्रतिसाद नाही. कारण त्या भागात अँटिबॉडीज तयार झाल्या असतील तरीही लसीकरणावर भर द्यावा लागेल, असे पांडेय यांनी सांगितले. लसीकरणासाठी महापालिकेने मेगा मोहीम आखली. परंतु, शासनाकडून लसचा पुरवठा पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. त्यामुळे लसीकरणाची गती खूपच संथ गतीने सुरू आहे. आतापर्यंत तीन लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. मुंबई महापालिकेला कसा प्रतिसाद मिळतो ते पाहून आम्ही लस खरेदीचा निर्णय घेणार आहोत. दररोज २० हजार नागरिकांचे लसीकरण करण्याची महापालिकेची क्षमता आहे, असे असले तरी लसच्या उपलब्धतेवर लसीकरणाच्या मोहिमेचे नियोजन केले जात आहे. डिसेंबरपूर्वी देशात व शहरात मोठ्या प्रमाणावर लस उपलब्ध होतील , असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
१४ लाख नागरिकांसाठी लसग्लोबल टेंडर काढून १४ लाख नागरिकांसाठी लस खरेदी करायचा विचार झाला तर त्याला किमान २५ कोटी रुपये खर्च येईल. महापालिकेकडे एवढी आर्थिक तरतूद आहे का, असा प्रश्न पांडेय यांना विचारला असता ते म्हणाले, अत्यावश्यक कामासाठी पैसा कमी पडणार नाही. पैशाची कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. लवकरात लवकर जास्तीत जास्त नागिरकांचे लसीकरण व्हावे, असा महापालिकेचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.