औरंगाबाद : आरोग्य उपसंचालक कार्यालयास रविवारी कोविशिल्ड लसीचे ८८ हजार डोस मिळाले. यात औरंगाबाद जिल्ह्यासाठी ४० हजार डोस देण्यात आले असून, ग्रामीण भागासाठी १५ हजार आणि २५ हजार डोस महापालिकेला देण्यात आले. त्यामुळे किमान आठवडाभर लसीकरण सुरळीत राहणार आहे. हिंगोलीला १० हजार, जालन्याला १८ हजार आणि परभणीला २० हजार डोसचे वितरण करण्यात आले आहे.
औरंगाबादेत दर आठवड्याला लसीचा पुरवठा केला जात आहे. नागरिकांचा लसीकरणाला प्रतिसाद वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून लसीच्या तुटवड्याचा प्रश्न उद्भवत आहे, परंतु लसींचा पुरवठा होत असल्याने हा प्रश्नही तत्काळ सुटत असल्याचे पाहायला मिळत आहे. १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस दिली जाणार आहे. त्यामुळे आगामी दिवसांत लसीचा पुरवठा वाढणार आहे. त्या दृष्टीने आरोग्य यंत्रणेने मागणीही केली आहे. जिल्ह्यासाठी ४० हजार डोस मिळाल्याने, जिल्ह्यातील सर्व लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरळीत राहणार असल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.
आज कोव्हॅक्सिन मिळणारआरोग्य उपसंचालक कार्यालयास सोमवारी कोव्हॅक्सिन लसीचे ७ हजार ३६० डोस मिळणार आहेत. त्यामुळे कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांचीही कोणतीही गैरसोय होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात झालेले लसीकरण- पहिला डोस - ३,४३,५२६- दुसरा डोस -४५,५८२- एकूण लसीकरण - ३,८९,१०८