औरंगाबाद : महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर शनिवारी बहुप्रतिक्षीत १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी लसीची ढाल घेण्यासाठी तरुणाईत मोठा उत्साह पहायला मिळाला.
जिल्हा सामान्य रुग्णालयात दुपारी २ वाजता लसीकरणाला सुरुवात झाली. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. कमलाकर मुदखेडकर, अधिपरिचारिका कुसूम भालेराव, श्रीलंका पवार, रेशमा शेख, अनिता जारवाल, गुलबस नागरगोजे, सागर दखणे, निखिल घोरपडे आदी उपस्थित होते. जिल्हा रुग्णालयात पहिल्या दिवशी लस घेण्यासाठी १०० जणांची नोंदणी झाली होती.
दुपारी दोन वाजता पहिल्या लाभार्थ्याला अधिपरिचारिका कुसूम भालेराव यांनी लस दिली. १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणाच्या जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. एस. व्ही. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळपासूनच तयारी सुरु होती. गेल्या चार महिन्यांपासून लसीची प्रतीक्षा करीत होतो. अखेर लस मिळाली, अशा प्रतिक्रिया तरुणांनी व्यक्त केल्या.