औरंगाबाद : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्र शासनाने १ मेपर्यंत कडक निर्बंध लावले आहेत. त्यानंतर ४५ किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना लस घेतली असेल तरच रस्त्यावर येऊ देण्याचा व व्यापाऱ्यांनी लस घेतली असेल तरच दुकाने सुरु करु देण्याचा निर्णय महापालिका घेणार आहे, या बद्दलचा सखोल विचार सध्या केला जात आहे. त्यामुळे लसीकरणासाठी पात्र असलेल्या वयोगटातील नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी केले.
फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पाण्डेय यांनी रविवारी संवाद साधला. १ मे नंतर सर्वकाही सुस्थितीत येईल, कोरोना जाईल असे नाही. कोरोना राहणारच आहे. रुग्णवाढ थांबवायची असेल तर लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे. ४५ आणि त्यावरच्या वयाच्या व्यक्तींचे लसीकरण केले जात आहे. या वयोगटातील ज्या व्यक्तींनी लस घेतली आहे त्याच व्यक्तींना नंतर रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी जाण्याची परवानगी देण्याबद्दल महापालिका गांभीर्याने विचार करीत आहे. त्याचप्रमाणे ज्या व्यापाऱ्यांनी, व्यावसायिकांनी लस घेतली आहे त्याच व्यापारी किंवा व्यावसायिकांना त्यांची दुकाने किंवा आस्थापना सुरु करण्याची परवानगी दिली जाईल. लवकरच याबद्दल निर्णय जाहीर केला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.
सध्या दररोज ६ हजार नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. ही संख्या दहा हजारावर नेण्याचे उद्दिष्ट आहे. ३० दिवसात तीन लाख व्यक्तींचे लसीकरण पूर्ण होईल आणि औरंगाबाद कोरोनाच्या बाबतीत सुरक्षित परिघात येईल, असे वाटते असा उल्लेख पांडेय यांनी केला. लसीकरणासाठी पालिकेने प्रत्येक वॉर्डात केंद्र सुरु केले आहे. ११५ वॉर्डात ११५ केंद्र आहेत, त्याशिवाय २६ खासगी केंद्र आहेत. सोमवारपासून व्यापारी वर्गासाठी ११, बँक अधिकारी – कर्मचाऱ्यांसाठी १० तर कामगारांसाठी दोन लसीकरण केंद्र सुरु केली जात आहेत. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा व जास्तीत जास्त संख्येने लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन त्यांनी केले.