औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधक लस आता कारमध्ये घेता येणार आहे. प्रोझोन मॉलच्या पार्किंगमध्ये हा उपक्रम सोमवारपासून राबविण्यात येणार आहे. महापालिका‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिन’ ही मोहीम प्रोझोन मॉलच्या पार्किंगमध्ये राबविणार असल्याचे मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.
कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला प्रतिसाद मिळण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांना पहिला व दुसरा डोस सध्या उपलब्ध आहे. सुमारे तीन लाख नागरिकांनी अद्याप लस घेतलेली नाही. त्यासाठी ही मोहीम हाती घेतली आहे. लस दिलेल्या प्रत्येकाला प्रोझोन मॉलच्या दोन्ही पार्किंगमध्ये अर्धा तास देखरेखीखाली ठेवले जाईल. लस घेतल्यानंतर अर्धातास थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.त्यामुळे लसीकरणाची गती वाढावी यासाठी महापालिकेने मुंबई, पुण्यापाठोपाठ ड्राइव्ह इन मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रावर ताटकळत थांबण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी ड्राईव्ह इन ही संकल्पना राबविण्याची सूचना केली. त्यानुसार आरोग्य विभागाने कारमधून या, लस घेऊन जा मोहीम राबविण्यात येत आहे. कारसह इतर चारचाकी वाहनामधून तसेच रिक्षामधून आलेल्या नागरिकांना लस देण्यात येईल, असे डॉ. पाडळकर यांनी सांगितले.
ही ओळखपत्रे लागतील लस घेण्यासाठीलस घेण्यासाठी आधार कार्ड, पॅनकार्ड, निवडणूक ओळखपत्राची गरज आहे. सोमवारपासून सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत लसीकरण केले जाईल, असे डॉ. पाडळकर यांनी सांगितले.