औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात लस देण्याबाबत प्रशासनाने तयारी केली आहे. लसीकरण, बायोवेस्टेज, मोहीम दररोज लसीकरण पार पडल्यानंतर खोल्या सॅनिटाइज करण्यात येतील. प्रत्येकाला लस दिल्यानंतर ३० मिनिटांपर्यंत निरीक्षणात ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.
लसीकरणाची तारीख आताच सांगता येणार नाही. तहसीलदार, बीडीओ, आरोग्य अधिकारी, शल्य चिकित्सक यांना याचे प्रशिक्षण दिले आहे. शहर व ग्रामीणसाठी केंद्र तयार करण्यात येणार आहेत. खाजगी डॉक्टर्सना देखील लस घेणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. डिसेंबर अखेरीस लस प्राप्त झाल्या, तर ग्रामपंचायत निवडणुका आणि लसीकरण मोहीम एकत्र राबवावी लागेल. डिसेंबर अखेरीस लसींचा साठा जिल्ह्याला प्राप्त होण्याची शक्यता आहे. लसीकरणाबाबत काही जण साशंक आहेत, तर काही लस घेतल्यानंतर विना मास्क फिरता येईल, असा विचार करत आहेत.
पहिल्या टप्प्यात शासकीय आणि खाजगी रुग्णालयांतील डाॅक्टर, परिचारिकांसह सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार आहे. ही संख्या जवळपास ३३ हजारांवर आहे. आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार सिडकोतील कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात वॉक इन फ्रीजर आणि वॉक इन कुलर आहे. या दोन्हींची क्षमता प्रत्येकी १२ क्युबिक मिटर इतकी आहे, तर छावणी येथेही १२ क्युबिक मिटर क्षमतेचे वॉक इन कुलर आहे. १ क्युबिक मिटर म्हणजे एक हजार लिटरची क्षमता होते. त्यानुसार ३६ हजार लिटरची क्षमता सध्या सज्ज आहे. मनपाकडे २४ आईस लाईन रेफ्रिजरेटर आहे.
शीतगृहांची जय्यत तयारीलसींच्या साठ्यासाठी मोठी क्षमता असलेले ‘वॉक इन फ्रीजर’ आरोग्य उपसंचालक कार्यालयाच्या पार्किंगच्या जागेत केले जाणार आहे. फ्रीजरमध्ये चालत जाता येऊ शकेल. या फ्रीजरची ४० क्युबिक मिटर इतकी क्षमता असणार आहे. प्रत्येक आरोग्य केंद्रात, रुग्णालयांत आईस लाईन रेफ्रिजरेटरची सुविधाही आहे. गरजेनुसार खासगी कोल्ड स्टोरेजचाही वापर केला जाऊ शकतो.