औरंगाबाद : घाटी रुग्णालयात शनिवारी (दि. 2) सकाळी ६.४० वाजता नुर काॅलनी येथील ६५ वर्षीय महिलेला भरती करण्यात आले. संशयीत म्हणून त्यांच्यावर उपचार सुरु असतांना त्यांचा सकाळी ८.०५ वाजता मृत्यू झाला. त्यांचा मृत्यूपश्चात घेतलेला स्वॅब पाॅझीटीव्ह आल्याची माहीती घाटीचे माध्यम समन्वयक डाॅ. अरविंद गायकवाड यांनी दिली. हा कोरोनाबाधितांचा हा नववा मृत्यू ठरला आहे.
डाॅ. गायकवाड यांनी दिलेल्या माहीतीनुसार, दोन्ही बाजुंचा न्युमोनिया, कोव्हीड १९ विषाणूची लागण, मधूमेह आणि उच्चरक्तदाब या कारणांमुळे या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. घाटी रुग्णालयात दुपारी चार वाजेपर्यंत एकुण १८५ रुग्णांची स्क्रिनींग झाली. त्यापैकी १८ जणांचे स्वॅब घेण्यात आले. त्यातील 11 जणांचे अहवाल पाॅझीटीव्ह आले. तर सात जणांच्या अहवालाची प्रतिक्षा आहे. सध्या घाटीत कोव्हीड क्रीटीकल हाॅस्पीटलमध्ये २२ पाॅझिटीव्ह रुग्ण भरती आहेत. त्यातील दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. तर ३५ निगेटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर ९ निगेटीव्ह रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णायातून सुटी देण्यात आली आहे.