औरंगाबाद : पंतप्रधान सहाय्यता निधीतून औरंगाबादसाठी आलेल्या १५० पैकी ५५ व्हेंटिलेटर विभागीय आयुक्तांच्या आदेशाने मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांत देण्यात आले आहेत. तसेच थेट जिल्ह्यांना दिलेले व्हेंटिलेटर चालू आहेत की बंद, याचा कोणताही अहवाल जिल्हा आरोग्य विभागाने देऊ नये, यासाठी दबावतंत्राचे राजकारण प्रशासनांतर्गत सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. एकूणच व्हेंटिलेटरचे ऑडिट करण्यासाठी आजपर्यंत शासनातर्फे कोणतीही समिती वा टीम व्हेंटिलेटरच्या ऑडिटसाठी आलेली नसल्याचे समजते.
व्हेंटिलेटर प्रकरणात सगळी यंत्रणा घाटी प्रशासनावर खापर फोडून मोकळी होत आहेेे. मात्र, आरोग्य विभागाकडून याबाबत अद्याप काहीही अभिप्राय आलेला नाही. एकमेकांवर टोलवी - टोलवी करण्याच्या प्रकरणात अंतर्गत राजकारणाला ऊत आला असून, कोरोना रुग्णांना पंतप्रधान सहायता निधीतून आलेल्या व्हेंटिलेटरचा कधी व किती फायदा होणार, हा प्रश्नच आहे. मराठवाड्यात विभागीय आयुक्तांच्या आदेशाने दिलेल्या व्हेंटिलेटरचे पुढे काय झाले, हे गुलदस्त्यात आहे. २७ एप्रिल, १ मे आणि १० मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने शहरातील खासगी रुग्णालयांना व्हेंटिलेटर देण्यात आले, तर विभागीय आयुक्तालयाने हिंगोलीत १५, बीडमध्ये १०, उस्मानाबादला १५, परभणीत १५ असे ५५ व्हेंटिलेटर दिले. येथील जिल्हा शल्यचिकित्सकांनी सदरील व्हेंटिलेटर इन्सटॉल (स्थापित) केले की नाही, त्याचा अहवाल अद्यापही आला नसल्याचे पत्र उपायुक्त जगदीश मिनियार यांनी २३ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना दिले. यानंतर जिल्हाधिकारी चव्हाण यांनी २७ एप्रिल रोजी युनायटेड सिग्मा हॉस्पिटलला ५, एमजीएम हॉस्पिटलला २० असे २५ व्हेंटिलेटर दिले. यानंतर १ मे रोजी पॅसिफिक हॉस्पिटलला ३ आणि एचएमजी हॉस्पिटलला ३ व्हेंटिलेटर त्यांनी दिले. १० मे रोजी पॅसिफिक हॉस्पिटलला पुन्हा १० व्हेंटिलेटर देण्यात आले.
सगळेच व्हेंटिलेटर तपासणारआ. सतीष चव्हाण हे १८ मेपासून मराठवाड्यात देण्यात आलेल्या व्हेंटिलेटरची तपासणी सुरू करणार आहेत. प्रत्येक जिल्हा चिकित्सकांकडून व्हेंटिलेटर स्थापित केल्यानंतर काय अडचण आली, याची लेखी माहिती ते घेणार आहेत. आरोग्य विभागाने व्हेंटिलेटरचे ऑडिट आजवर करणे अपेक्षित होते. परंतु ते का झाले नाही, याबाबत आ. चव्हाण यांनी शंका उपस्थित केली.
व्हेंटिलेटर आल्यानंतरचा प्रवास असा : ६ एप्रिल रोजी १५० व्हेंटिलेटर आले.१२ एप्रिल रोजी धमन-३ कंपनीचे १०० नग आले.१८ एप्रिल रोजी २५ व्हेंटिलेटर इन्सटॉल केले.२० एप्रिल रोजी २५ व्हेंटिलेटरमध्ये त्रुटी आढळल्या.२३ एप्रिल रोजी २ दुरूस्त केले, ते पुन्हा बिघडले.२३ एप्रिल रोजी विभागीय आयुक्तांनी ५५ची मागणी केली.२७ एप्रिल रोजी २५ व्हेंटिलेटर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.६ मे रोजी धमन-३ च्या व्हेंटिलेटरचे इन्स्पेक्शन झाले.१० मे रोजी व्हेंटिलेटरवरून राजकारण तापण्यास सुरूवात.१४ मे रोजी कंपनी अभियंता रिपोर्ट न देता निघून गेले.१७ मे रोजी यावरून शिवसेना-भाजपचे राजकारण सुरु.१८ मे रोजी ५५ व्हेंटिलेटरची उलटतपासणीची मागणी.