औरंगाबाद : राज्यात गुरुवारी रात्री आठ वाजल्यापासून लॉकडाऊन लागू झाल्यामुळे नागरिकांना विना पास परजिल्ह्यात अथवा परराज्यांत जाण्यास मनाई करण्यात आली आहे. अत्यावश्यक प्रकरणात शहर पोलीस आयुक्तालयाकडून लवकरच ई पास सुविधा उपलब्ध केली जाणार आहे.
लॉकडाऊनच्या नियमावलीनुसार कोणत्याही नागरिकांना विना परवानगी (अधिकृत पास) परजिल्ह्यात अथवा परराज्यात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त यांची गुरुवारी बैठक झाली. या बैठकीत नागरिकांना महत्त्वाच्या कारणासाठी परजिल्ह्यात जाण्यासाठी ई पास उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. गतवर्षीप्रमाणे पोलीस प्रशासनाकडून ई पासची सुविधा उपलब्ध केली जाणार असल्याचे पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी सांगितले. या करिता काही निकष असतील. विशिष्ट कारणासाठीच नागरिकांना परजिल्ह्यात जाण्याची परवानगी असेल. आयुक्त म्हणाले की, नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ; मात्र नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडण्याचे टाळावे, अथवा आवश्यकता नसेल तर प्रवास टाळावा, असे आवाहन त्यांनी केले.
असा करा ई-पाससाठी अर्ज अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय उपचार किंवा अशा प्रकारच्या टाळता न येण्यासारख्या कारणांसाठीच फक्त प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. मात्र, अशा प्रवासासाठी पास काढण्याची सक्ती करण्यात आली आहे. यासाठी पोलीस विभागाकडून संकेतस्थळाची लिंक देण्यात आली आहे. आपल्या ब्राऊजरमधून https://covid19.mhpolice.in/ या संकेतस्थळावर जा. याच पेजवर तुम्हाला ई-पाससाठी अर्ज करण्याची आणि तो डाऊनलोड करण्याची लिंक दिसेल. या लिंकवरून संबंधितांनी पाससाठी अर्ज करण्याचं आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आलं आहे.