- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : स्थळ जिल्हा सामान्य रुग्णालय, अप्रोन घातले आणि मास्क बांधलेले काही जण फोनवर फोन करीत होते. हॅलो म्हणत समोरच्या व्यक्तिला तब्येत कशी आहे, घरचे कसे आहेत, अशी आपुलकीने विचारणा करीत होते. समोरचा व्यक्ती काहीही त्रास नसल्याचे सांगून फोन ठेवत होता, तर एखादा व्यक्ती 'मला त्रास होत आहे, भिती वाटत आहे, माझा लाळेचा नमुना तपासणीसाठी घ्या' असे म्हणत होता.
कोरोनाच्या संशयामुळे सध्या होम क्वारंटाईनमधील लोकांशी दररोज संपर्क केल्यानंतर असा संवाद घडत आहे. जिल्हा रुग्णालयात जिल्हा समुपदेशक तेजस्विनी तुपसागर, समाजसेवा अधीक्षक साहेबराव केळोदे, समुपदेशक डॉ. महेश मरकड, योगेश सोळुंके, दत्ता बढे, नीता आगे, शीतल बागुल, सीताराम विधाते हे सर्व जण सध्या दररोज होम क्वारंटाईनमधील लोकांशी फोनरून संवाद साधत आहे. होम क्वारंटाईनमधील लोकांशी दररोज संवाद साधनाऱ्या या पथकाच्या कामाविषयी ग्राऊंड रिपोर्टिंगमधून जाणून घेण्यात आले.
जिल्हा रुगणलायात ६ मार्चपासून तपासणीसाठी आलेल्या तब्बल ६०५ होम क्वारंटाईनमधील नागरिकांशी सलग १४ दिवस फोनवर संवाद साधून त्यांची प्रकृती जाणून घेण्याची जबाबदारी हे पथक पार पाडत आहेत. सोमवारी सकाळी रुग्णालयात आल्यानंतर पथकातील प्रत्येक जण स्वतःकडे असलेल्या यादीतील लोकांशी संपर्क करून संवाद साधण्यात मग्न होता. होम क्वारंटाईनच्या पहिल्या दिवशी संशयित व्यक्तीला तो कुठे गेला होता, कोणाच्या संपर्कात आला होता, याची विचारणा केली जात होती. ज्यांचा दुसरा, तिसरा आणि पुढील दिवस होता, त्यांना 'सर्दी, खोकला आहे का, घसा दुखत आहे का, कुटुंबातील इतर सदस्यांना काही त्रास जाणवत आहे अशी विचारणा केली जात होती. काही संशयितांचे फोन लागत नव्हते, त्यांच्याशी पुन्हा पुन्हा संपर्क केला जात होता. संपर्क साधल्यानंतर काही जणांकडून अनाहूत भीती व्यक्त केली जात होती. त्यांना धीर दिला जात होता, समुपदेशन केले जात होते. काही त्रास होत असेल तर योग्य खबरदारी घेऊन रुग्णालयात येण्याचा सल्ला दिला जात होता.
तिसऱ्यांदा स्वब घेण्याची विनंती
कोरोनाच्या संशयाने एका महिलेचा दोनदा स्वब घेण्यात आला, दोन्ही वेळेस हे अहवाल निगेटिव्ह आले. होम क्वारंटाईनचा कालावधी संपला. तरीही त्रास होत असल्याचे म्हणत तिसऱ्यांदा स्वब घेण्याची विनंती महिलेने केली. तिचे समुपदेशन करण्यात आले. २१९ जनांचा १४ दिवस पाठपुरावा होम क्वारंटाईनमधील ६०५ पैकी २१९ जणांचा १४ दिवस पाठपुरावा करण्यात आला. त्यांच्यात कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत, असे समाजसेवा अधीक्षक साहेबराव केळोदे यांनी सांगितले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस.व्ही.कुलकर्णी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश लड्डा, डॉ. पद्मा बकाल, डॉ. प्रदीप कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक काम करीत आहेत.