औरंगाबाद : महापालिकेच्या मेल्ट्रॉन हॉस्पिटलमधील रुग्णांसाठी १० हजार रेमडेसिविर इंजेक्शन्सची खरेदी करण्यात आली होती. अवघ्या १० ते १२ दिवसात तब्बल ४ हजार इंजेक्शन्सचा वापर करण्यात आल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. ३५० रुग्णांची क्षमता असलेल्या रुग्णालयात दररोज ३०० इंजेक्शन्सचा वापर होत आहे. इंजेक्शन्स वापराचे प्रमाण जवळपास ८५ टक्के आहे. वापरलेल्या इंजेक्शनचे वाईल सुद्धा रुग्णालयात उपलब्ध नाहीत. त्यामुळे घाटीप्रमाणे महापालिकेतही रेमडेसिविरचा काळाबाजार होतोय का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रेमडेसिविर इंजेक्शन लाइफ सेविंग ड्रग नाही. मात्र, कोरोनामध्ये डॉक्टर याचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत. महापालिकेने मागील महिन्यात थेट कंपनीकडून ६५० रुपयांमध्ये तब्बल १० हजार रेमडेसिविर इंजेक्शन्सची खरेदी केली. यातील दोन हजार इंजेक्शन्स घाटी रुग्णालयाला देण्यात आली होती. शुक्रवारी पोलिसांनी काळ्याबाजारात पकडलेले इंजेक्शन महापालिकेने घाटी रुग्णालयाला दिले होते. या घटनेनंतर महापालिकेतील रेमडेसिविर इंजेक्शनच्या साठ्याबद्दल माहिती घेतली असता, अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. महापालिकेच्या मेल्ट्रॉन हॉस्पिटलमध्ये दररोज तब्बल तीनशे रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन देण्यात येत असल्याची खळबळजनक माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. मेल्ट्रॉन रुग्णालयाची रुग्ण क्षमता फक्त ३५० आहे. त्यातील ८५ टक्के म्हणजेच जवळपास तीनशे रुग्णांना तर रोज रेमडेसिविर इंजेक्शन देण्यात येत आहे. मागील आठ ते दहा दिवसांमध्ये तब्बल ४ हजार इंजेक्शन्स संपलीसुद्धा. रुग्णांना इंजेक्शन दिल्यानंतर वाईल सांभाळून का ठेवण्यात आले नाही, याचे उत्तर महापालिकेकडे नाही. ४ हजार इंजेक्शन्सचे वाईल कचऱ्यात टाकण्यात आल्याचा दावा मनपाकडून करण्यात येत आहे. महापालिकेकडे सध्या ३ हजार ९८० इंजेक्शन्स शिल्लक आहेत.
प्रत्येक रुग्णाचे रेकॉर्ड मनपाकडेमेल्ट्रॉन हॉस्पिटलमध्ये ज्या रुग्णांना इंजेक्शन देण्यात आली आहेत, त्यांचे रेकॉर्ड आणि संबंधित रुग्णांची सहमती घेण्यात आलेली आहे. इंजेक्शनचे वाईल संसर्गजन्य असतात त्यामुळे ते जास्त दिवस सांभाळून ठेवता येत नाही, असे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी नीता पाडळकर यांनी सांगितले. घाटी रुग्णालय वाईल सांभाळून ठेवत आहे, तर महापालिका का ठेवत नाही? या प्रश्नावर पाडळकर यांनी सांगितले की, आम्ही सुद्धा यापुढे वाईल सांभाळून ठेवू.