औरंगाबाद : मराठवाड्यात कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत असून, मृत्युदरदेखील वाढतो आहे. या पार्श्वभूमीवर पूर्ण विभागात जिल्हानिहाय सरकारी यंत्रणेसोबत भाजपची टास्क फोर्स स्पर्धा करणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सुविधांचे तीन कोविड सेंटर उभारण्यात येणार आहेत. नाममात्र दरात या सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहे.
भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दोन दिवसांपूर्वी मराठवाडा भाजपच्या खासदारांची ऑनलाईन बैठक घेतली. या बैठकीत खा. डॉ. भागवत कराड यांनी मराठवाड्यातील कोरोनाची परिस्थिती आणि राज्य सरकार काय करीत आहे, याबाबत भूमिका मांडली. मराठवाडा प्रमुख म्हणून कराड यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री खा. रावसाहेब दानवे, खा. प्रीतम मुंडे यांच्यासह सर्व विभागातील सर्व खासदार बैठकीला उपस्थित होते.
मराठवाड्यात जिल्ह्यानिहाय हेल्पलाईन सुरू केली आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी एक क्रमांक देण्यात आलेला आहे. कोरोना रुग्णाला जे काही लागणार ते पुरविण्यासाठी तिघांचा स्टाफ काम करणार आहे. पुढील काही महिने वॉररूमच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी तयारी केली आहे. ऑक्सिजन, अन्नधान्य, इंजेक्शन, औषधी पुरवठादेखील करण्यासाठी भाजपच्या विभागीय फळीने काम करावे, अशा सूचना केंद्रीय पातळीवरून करण्यात आल्या. रेमडेसिविरच्या पुरवठ्यावरून काही खासदारांनी बैठकीत प्रश्न विचारले. यावर नड्डा यांनी सांगितले, देशात ७ कंपन्या यापूर्वी उत्पादन करीत होत्या. त्यांचे पेटंट केंद्र शासनाने काढून घेतले असून, उर्वरित कंपन्यांना उत्पादनाची परवानगी दिली आहे. त्या इंजेक्शनचा तुटवडा यापुढे जाणवणार नाही. ५० किंवा १०० खाटांचे व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन सुविधासह कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे.
केंद्राकडून प्लांटसाठी अनुदानमराठवाडा टास्क फोर्सचे प्रमुख खा. डॉ. कराड यांनी सांगितले, राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांनी पूर्ण विभागात लोकांपर्यंत जाण्यास सुचविले. कोविड सेंटरसाठी जिल्हानिहाय जागांचा शोध घेण्याच्या सूचनाही केल्या. औरंगाबादमध्ये तीन जागा शोधल्या आहेत. ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना पत्र दिले असून, केंद्र शासनाच्या अनुदानातून औरंगाबादमध्ये स्वतंत्र प्लांट सुरू करण्यासाठी अनुदान मिळणार आहे. जिल्हानिहाय प्रत्येकावर जबाबदारी दिली आहे.