औरंगाबाद : ग्रामीण भागातील नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेण्याकडे पाठ फिरवल्याने जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या गोदामातील सुमारे ४० हजार कोविशिल्ड लसीचे डोस कालबाह्य (एक्सपायर्ड) होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती समोर आली आहे. आता या लसीचा साठा पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटला परत पाठविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. कोविड महामारीनंतर गतवर्षी लसीकरणाला सुरूवात झाली. सुरूवातीला पहिला डोस घेण्यासाठी नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. मात्र, काहीजण लसीकरणाला प्रतिसाद देत नव्हते. तेव्हा प्रशासक नीलेश गटणे यांनी युद्धपातळीवर विशेष मोहीम राबवून लसीकरण यशस्वी केले होते. ८४ टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला होता. दुसरा डोस घेण्याबाबत मात्र नागरिक उदासीन आहेत. जिल्ह्यातील सुमारे ७ लाख नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला नाही.
कोरोनाची चौथी लाट उंबरठ्यावर असताना आरोग्य विभागाने सतत आवाहन करूनही जिल्ह्यातील नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाला मिळालेले कोविशिल्ड लसीचे ४० हजार डोस कालबाह्य होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतची माहिती आरोग्य विभागाने शासनाला कळविली आहे. यामुळे लसीचा हा साठा पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटकडे परत पाठविण्यात येणार आहे.