- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ( Corona Virus in Aurangabad) गंभीर रुग्णांना व्हेंटिलेटरअभावी एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात नेण्याची धडपड करावी लागली. त्यात काहींना जीवही गमवावा लागला. त्यानंतर व्हेंटिलेटरसह यंत्रसामग्रीची संख्या वाढविण्यात आली. पण आता कोरोना रुग्णांची संख्या कमी होताच यंत्रसामग्रीच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने शासकीय रुग्णालयांतील अनेक यंत्रे भंगारात जात आहेत.
घाटी रुग्णालयाला पीएम केअर फंडातून १५० व्हेंटिलेटर्स मिळाले. यातील अनेक व्हेंटिलेटर्स नादुरुस्त आणि आयसीयुत वापरण्यायोग्य नसल्याचा प्रकार ‘लोकमत’ने समोर आणला होता. याची न्यायालयानेही गंभीर दखल घेतली. त्याचबरोबर घाटीत सुपर स्पेशालिटी ब्लाॅकची भव्यदिव्य इमारत उभी राहिली. येथे अन्य यंत्रांसह जवळपास १४ लाख रुपये किमतीचे ३५ व्हेंटिलेटर्स मिळाले. त्याशिवाय सीएसआर फंडातूनही नवे व्हेंटिलेटर्स मिळाले. आजघडीला घाटीत कोरोनाचे केवळ १६ रुग्ण भरती आहेत. यातील १४ रुग्ण गंभीर आहेत. जुलैनंतर कोरोना रुग्ण घटले. त्यामुळे वापर कमी होऊन अनेक व्हेंटिलेटर्स, माॅनिटर्ससह अनेक उपकरणे धूळ खात पडून आहेत.
घाटीत ३०० वर व्हेंटिलेटर्सपहिल्या लाटेत सप्टेंबर २०२० मध्येही कोरोना रुग्णांना व्हेंटिलेटर मिळत नव्हते. त्यापेक्षा अधिक गंभीर स्थिती दुसऱ्या लाटेत बनली. सध्या घाटीत जवळपास ३१५ व्हेंटिलेटर्स आहेत. आता नव्या म्युटंटसह कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट उभे आहे. परंतु धूळ खात पडलेल्या व्हेंटिलेटरकडे कोणाचे लक्ष जाताना दिसत नाही. पीएम केअर फंडातील १९ व्हेंटिलेटर्स मेडिसीन विभागात वापरण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
तपासणी करतोयघाटीतील व्हेंटिलेटर्ससह इतर यंत्रसामग्री, ऑक्सिजन यंत्रणेचा आढावा आणि तपासणी केली जात आहे. आवश्यक त्या ठिकाणी देखभाल-दुरुस्तीची कामे केली जातील.- डाॅ. वर्षा रोटे, अधिष्ठाता, घाटी रुग्णालय
तपासणीच्या सूचनाजिल्हा रुग्णालयात २५ आयसीयु बेड आहेत. यंत्रे, सोयी-सुविधांची तपासणी करण्याची सूचना दिली आहे. जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयात आवश्यक ती खबरदारी घेतली जाईल.- डाॅ. प्रदीप कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक