औरंगाबाद : कोरोनाच्या दहशतीखाली अवघे जग आले आहे. तर कोरोनामुळे शाळांना मिळालेल्या सक्तीच्या सुट्यांमुळे मात्र शहरातील लहान बालके भलतेच खुश दिसत आहेत. परस्परविरोधी असणारे हे चित्र सुटीची बातमी कळताच घराघरांत दिसून आले.
परीक्षांमुळे मार्च महिना खरेतर विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टीने तणाव देणारा ठरत असतो. ‘परीक्षा जवळ आली आहे, अभ्यासाला बसा’ असे पालुपद विद्यार्थ्यांना या काळात सतत ऐकावे लागते. अनेक शाळांनी विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक दिले होते. यानुसार मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात परीक्षेला सुरुवात होणार होती. मात्र सुट्यांचा शासन निर्णय आल्यामुळे परीक्षा होणार की नाही किंवा पुढे ढकलणार याबाबत सगळीच अनिश्चितता आहे.
सीबीएसई बोर्डाच्या काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष संपले असून, त्यांना सुट्याही लागल्या आहेत. तर काही शाळांच्या परीक्षा संपत आल्या असून, अवघे एक- दोन विषयांचे पेपर बाकी आहेत. त्यामुळे आता उरलेले एक- दोन पेपर कधी होणार? याबाबतही पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.कर्नाटक राज्यात कोरोनाच्या धास्तीमुळे तेथील राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन शाळा- महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय याआधीच घेतलेला आहे. तेथील इयत्ता पहिली ते सहावीच्या शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित आणि इतर शाळांमधील परीक्षा रद्द करण्यात आल्या असून, मागे झालेल्या परीक्षेच्या आधारावर विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करून जूनमध्ये सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षापासून शाळेला येण्याचे आदेश कर्नाटक सरकारच्या शिक्षण विभागाने नुकतेच दिले आहेत. त्यानुसार आपल्याकडेही असे होऊ शकते का? अशी चर्चाही पालक मंडळी करतांना दिसत होती.
स्कूल बसचालकांकडून संमिश्र प्रतिक्रियाशाळांना सुटी लागल्यामुळे काही स्कूल बस चालकही सध्या आनंदी आहेत. काही जण प्रथम सत्र किंवा द्वितीय सत्रातील महिन्याची फीस एकरकमी घेतात. त्यामुळे व्यवसायावर परिणाम होण्याची भीती नाही. उलट आता शाळांना सुट्या असल्यामुळे पेट्रोल बचत होईल, असे सांगत बहुतांश वाहनचालकांनी आनंद व्यक्त केला. तर महिन्याची फीस महिन्याच्या शेवटी घेणाऱ्या वाहनचालकांनी मात्र व्यवसायाला फटका बसणार म्हणून चिंता व्यक्त केली आहे.
परिस्थिती पाहून परीक्षेचा निर्णयसध्या तरी ३१ मार्चपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा शासन निर्णय आहे. यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊनच ३१ मार्चनंतर नेमके काय करायचे हे ठरविले जाईल. पुढील काही दिवसात कोरोनामुळे नेमकी काय स्थिती असेल, यावर सगळे अवलंबून आहे. एप्रिल महिना हा परीक्षेचाच असतो. त्यामुळे होम एक्झामसाठी एप्रिलमध्ये वेळ आहे. पण तरीही परिस्थितीचा फेरआढावा घेऊनच सगळ्या राज्याला लागू होणारे धोरण जाहीर करण्यात येईल. सध्या तरी परीक्षा रद्द झाल्या आहेत का? एप्रिलमध्ये होतील किंवा नाही? याबाबत काहीच सांगता येणार नाही. -बी. बी. चव्हाण, शिक्षण अधिकारी (माध्यमिक विभाग)