औरंगाबाद : रेल्वे स्थानकावर विमामास्क आणि लस न घेतलेल्या प्रवाशांची महापालिकेच्या पथकाकडून कोरोना टेस्ट ( Corona Virus in Aurangabad ) करण्यात येत आहे. पूर्वी केवळ सचखंड एक्स्प्रेसने औरंगाबादेत येणाऱ्या प्रवाशांची चाचणी करण्यात येत होती. मात्र, आता दिवसभर बेजबाबदारपणे वागणाऱ्या रेल्वे प्रवाशांची प्राधान्याने तपासणी करण्यात येत आहे. दिल्ली आणि हैदराबादहून विमानाने येणाऱ्या प्रवाशांचीही विमानतळावर तपासणी करण्यात येत आहे.
महापालिकेच्या पथकाकडून औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर सकाळी ९ ते रात्री ९ वाजेदरम्यान प्रवाशांची अँटिजन आणि आरटीपीसीआर तपासणी करण्यात येत आहे. रेल्वेतून उतरल्यानंतर मास्कशिवाय बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना महापालिकेचे माजी सैनिक कर्मचारी अँटिजन तपासणीसाठी थांबवितात. अनेक युवक, प्रवासी विनामास्क वावरतात. अशांना मास्कचे महत्त्व मनपाच्या पथकातर्फे सांगण्यात येत आहे. रेल्वे स्टेशनवर मंगळवारी सकाळी ९ वाजेपासून दुपारी १ वाजेपर्यंत ७० प्रवाशांची अँटिजन टेस्ट करण्यात आली. सुदैवाने यात एकही कोरोनाबाधित आढळून आला नाही. १५ जणांचे आरटीपीसीआर तपासणीसाठी स्वॅबचे नमुने घेण्यात आले. मनपा पथकातील ऋषीकेश गव्हाणे, प्रदीप राठोड, व्ही. के. माळकर आदी यासाठी परिश्रम घेत आहेत.
दिल्ली, हैदराबाद विमान प्रवाशांची चाचणीदिल्ली आणि हैदराबादहून येणाऱ्या विमान प्रवाशांकडे लसीकरणाचे प्रमाणपत्र विचारले जाते. ज्यांच्याकडे ते नाही, अशा प्रवाशांची कोरोना तपासणी करण्यात येत असल्याची माहिती विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.