औरंगाबाद: कोरोना व्हायरसमुळे औरंगाबाद महापालिकेची निवडणूक सहा महिने पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी आज महापौर नंदकुमार घोडेले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. दरम्यान, औरंगाबाद महापालिकेची एप्रिल २०२० मध्ये मुदत संपणार आहे, वार्ड आरक्षण आणि मतदार याद्या जाहीर झाल्या असून निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पुढे आले आहे. दुबईहून पुण्यात परतलेल्या ५ जणांना कोरोनाची लागणं झाली आहे, यामुळे नागरिक चिंतेत आहेत. कोरोनाचा वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर पैठण येथील ४२५ वर्षांची परंपरा असलेला नाथषष्ठी हा सोहळासुद्धा रद्द करण्यात आला आहे. आता खबरदारीचा उपाय म्हणून महापालिका निवडणुका सहा महिने पुढे ढकलण्याची मागणी पुढे आली आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांनी पालिका निवडणूक सहा महिने पुढे ढकलावी, पालिकेवर प्रशासकीय अधिकारी न नेमता विद्यमान नगरसेवकांनाचा सहा महिने मुदत वाढ देण्यात यावी अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचे सांगितले. दरम्यान, कोरोनापासून खबरदारीचा उपाय म्हणून विविध शाळा आणि महाविद्यालयातील स्नेह संमेलन रद्द करण्यात आली आहेत.