- योगेश पायघन औरंगाबाद : कोरोना अद्याप गेलेला नाही. पुढील किमान पाच ते सहा महिने तरी अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. पहिल्या अनलाॅकनंतर केलेल्या त्या पाच चुका पुन्हा केल्यास तिसरी लाट अटळ आहे. त्यामुळे निर्बंध शिथिल झाले तरी सभा, समारंभ, लग्न, अंत्यविधीतील गर्दी टाळा, लसीकरणाला प्राथमिकता द्या, कोरोनाची त्रिसूत्री पाळा, मला काही होत नाही, ही वृत्ती सोडून कोणतेही लक्षणे दिसले तर दुखणे अंगावर न काढता उपचार घ्या, आता काही होत नाही म्हणून सुपरस्प्रेडर बनू नका, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले यांनी केले.
कोरोना बाधितांचे आकडे हळूहळू कमी होऊन बाधितांसह सक्रिय रुग्णांची संख्या जिल्ह्यात ३ हजाराच्या जवळ आली आहे. १ जूनपासून निर्बंधही शिथिल व्हायला सुरुवात झाली. मात्र, पहिल्या अनलाॅकमध्ये केलेल्या चुकांमुळे दुसऱ्या लाटेत आरोग्य यंत्रणेसह सर्वांचीच तारांबळ उडाली. इतके संक्रमण जिल्ह्यात वाढले होते. त्यामुळे तिसऱ्या लाटेकडे मार्गक्रमण होऊ नये. ती लाट थोपवताना पहिल्या लाटेतून दुसऱ्या लाटेकडच्या प्रवासातून धडा घेण्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. प्रत्येकाने कोरोनाचे संक्रमण स्वत:ला, कुटुंबाला, शेजाऱ्यांना, परिसरात, गावात होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून केल्या जात आहे.
या पाच चुका पुन्हा करू नका!१-सण, सभा, समारंभ, धार्मिक कार्यक्रम, लग्न, अंत्यविधी, आंदोलनांत गर्दी.२-कोरोनापासून बचावासाठी मास्क, सुरक्षित अंतर, वेळोवेळी हात धुणे या त्रिसूत्रीकडे दुर्लक्ष.३-लक्षणे दिसल्यावर कोरोनाच्या तपासणीला टाळाटाळ, मला काही होत नाही म्हणत अंगावर दुखणे काढले, ते सुपरस्प्रेडर बनले.४-कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केल्यावरही मास्क टाळला. सर्दी, ताप, खोकल्यावर घरगुती उपाय करून लक्षणे लपवली.५-अनलाॅकनंतर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला, बाजारपेठा, हाॅटेल्स, पर्यटनात त्रिसूत्री दुर्लक्षित करून बिनधास्त वावर.
पथकांची असेल नजर-३० माजी सैनिकांचे नागरी मित्र पथक नागरिक कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना, निर्बंध, नियमांचे सामान्य नागरिकांना अंमलबजावणी करण्याकडे लक्ष ठेवून दंडात्मक कारवाई करते.-व्यापारी पेठा, बाजारपेठा, आस्थापना घालून दिलेल्या निर्बंधाचे पालन कसे करते. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी मनपाने दहा पथकांची स्थापना केलेले आहे.- अन्न औषध प्रशासक, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी यांचेही एक फिरते पथक जिल्ह्यात उपयायोजनांची अंमलबजावणी होते का काय याकडे लक्ष ठेवून असते.- ग्रामीण भागात ग्रामदक्षता समित्या, तालुका समन्वय अधिकारी, गटविकास अधिकाऱ्यांची पथके वेळोवेळी दौऱ्यात नियम, निर्बंधांचे पालन होते का याची खातरजमा करून आवश्यक तेथे दंडात्मक कार्यवाही करतात.- शहरासह जिल्ह्यात पोलीस दलाकडूनही ठिकठिकाणी नाकाबंदी, नागरिकांना पोलीस वाहनांवरून आवाहन करून कोरोनाचे नियम पाळण्यासंबंधी आवाहन करण्यात येते.
पहिला अनलाॅक : ४ ऑगस्ट २०२०एकूण कोरोना रुग्ण -१५,१५०बरे झालेले रुग्ण -११,३६८मृत्यू -४९३
दुसरा अनलाॅक : १ जून २०२१एकूण कोरोना रुग्ण -१,४२,८८९बरे झालेले रुग्ण - १,३६,४६३मृत्यू -३,२१४