- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : घाटीत अखेर आजपासून कोरोनाची तपासणी सुरू झाली आहे. 'एनआयव्ही'ने चाचणीसाठी मंजुरी दिली. त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयातून पहिला लाळेचा नमुना तपासणीसाठी घाटी रुग्णालयाकडे रवाना झाला.तपासणीचसाठी पहिला नमुना रवाना करताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एस.व्ही.कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अर्चना भोसले आदी उपस्थित होते. चाचणीसाठी ' एनआयव्ही' ने मंजुरी दिली, अशी माहिती अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर यांनी दिली.
विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा (व्हीआरडीएल) मंजूर करण्यात आली होती. मात्र, ही प्रयोगशाळा कागदावरच राहिली होती, महिनोन्महिने तिची प्रतीक्षाच करावी लागली. परिणामी, स्वाईन फ्लू आणि सध्या धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाच्या निदानासाठी पुण्यातील ‘एनआयव्ही’वरच भिस्त होती. त्यामुळे मराठवाड्याला विषाणूजन्य आजारांच्या निदानासाठी वाट पाहण्याची वेळ ओढवत होती. याविषयी 'लोकमत' वाचा फोडली आणि अखेर घाटीत चाचणी सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला.ही तपासणी सुरू करण्यासाठी सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डॉ. ज्योती बजाज - इरावने यांनी परिश्रम घेतले.