औरंगाबाद : जिल्ह्यातील नाथषष्ठीसह इतर यात्रा कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेता रद्द होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शासनाने गर्दी जमेल अशा ठिकाणचे कार्यक्रम रद्द करण्याबाबत प्रशासनाला सूचना केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी ९ मार्च रोजी विभागीय आयुक्तालयात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मराठवाड्यातील धार्मिक यात्रांबाबतदेखील या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.
कोरोना व्हायरसचा सर्वांनी धसका घेतला असून, त्या व्हायरसमुळे सर्वत्र परिणाम होण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासकीय यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. विभागासह औरंगाबादेतील धार्मिक उत्सव, यात्रांना होणारी गर्दी यासाठी काय नियोजन आहे, याचाही आढावा बैठकीत घेण्यात येईल. विभागनिहाय सर्वस्तरावर याबाबत प्रशासनाने पत्र पाठविले आहे. कोरोनाचा धोका पाहता ज्या यात्रांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे, त्या यात्रा, उत्सवांबाबत शासनाने गांभीर्याने निर्णय घेण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. जिल्ह्यातील मोठा धार्मिक सोहळा म्हणजे नाथषष्ठी आहे. या उत्सवाला ८ ते १० लाख भाविकांची मांदियाळी असते. १५ दिवस चालणारा हा उत्सव असून कोरोना व्हायरसच्या धसक्यामुळे नाथषष्ठीबाबत प्रशासन काय निर्णय घेणार, खबरदारी म्हणून काय उपाययोजना करणार, हे सोमवारी स्पष्ट होईल.