औरंगाबाद : मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून म्हणजेच सुमारे ८७ दिवसांपासून शहराचे ठप्प पडलेले अर्थकारण ७ जून सकाळी ७ वाजेपासून सुसाट धावणार आहे. शहरात सर्व प्रकारची दुकाने, मॉल, क्रीडांगणे आणि चित्रपटगृहेही सुरू राहणार आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शहरात (महापालिका हद्द) लागू केलेले लॉकडाऊनचे निर्बंध मागे घेण्यात आले आहेत. शासनाच्या वर्गवारीनुसार मनपा हद्द पहिल्या गटात आल्यामुळे शहराचा आर्थिक उलाढालीचा गाडा आता रुळावर येणार आहे. जमावबंदी आणि संचारबंदी मागे घेण्यात आली आहे. ग्रामीण भाग तिसऱ्या गटात आल्याने त्या ठिकाणी काही कडक निर्बंध लागू असणार आहेत.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महापालिका प्रशासन आस्तिककुमार पांडेय, पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी रविवार ६ जून रोजी दिवसभर शासनाच्या सूचनांचे बारकाईने अवलोकन करून शहरातील लॉकडाऊन शिथिल केले, तर ग्रामीण भागासाठी काही निर्बंध लागू केले. तिन्ही अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे काढलेल्या आदेशात असे म्हटले आहे, महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची पॉझिटिव्ह टक्केवारी २.२४ टक्के आहे. ऑक्सिजन बेडवर २२.१९ टक्के रुग्ण आहेत. त्यामुळे शासन वर्गवारीनुसार शहर पहिल्या गटात आले आहे.
नियम पाळावे लागणारकेंद्र शासनाच्या कोरोनाबाबत नियमांचे सर्व बाजारपेठा, मॉल्स, सिनेमागृह, उत्पादक, उद्योगांना पालन करावे लागणार आहे. दोन नागरिकांत किमान सहा फूट अंतर, सॅनिटायझर वापरणे, फेसशिल्ड, ई-पेमेंट, एसओपीचा वापर करणे बंधनकारक राहणार आहे.
शहरात या घटकांना दिली आहे परवानगीअत्यावश्यक वस्तू व सेवासंबंधी दुकाने, इतर व्यवसाय व दुकाने, मॉल्स, नाट्यगृहे, चित्रपटगृहे, रेस्टॉरंट, हॉटेल्स, खानावळी, शिवभोजन थाळी केंद्र, सार्वजनिक ठिकाणे, क्रीडांगणे, मोकळ्या जागा, उद्याने, बाग, सायकलिंग, मॉर्निंग वॉकिंग, खासगी आस्थापना सर्व नियम पाळून १०० टक्के क्षमतेने सुरू करता येतील.- शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालये नियमांसह १०० टक्के सुरू राहतील.- क्रीडा प्रकार, चित्रीकरण, स्रेहसंमेलन, सामाजिक, सांस्कृतिक करमणुकीचे कार्यक्रम- विवाह समांरभ, अंत्यविधी, सभा, निवडणुका, स्थानिक प्राधिकरण व सहकारी संस्थांच्या आमसभा- बांधकाम, कृषि संबंधित सर्व बाबी, ई-कॉमर्स सेवा, जिम, सलून, ब्युटीपार्लर, स्पा, वेलनेस सेंटर
सार्वजनिक वाहतूक सुरू, उद्योगांना परवानगी- सार्वजनिक बसवाहतूक पूर्ण आसन क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. प्रवाशांना उभे राहून प्रवास करता येणार नाही.- कार्गाे वाहतूक सेवा जास्तीत जास्त तीन व्यक्तींसाठी असेल.- आंतरजिल्हा प्रवासी वाहतुकीत बस, टॅक्सी, रेल्वे, खासगी कारना पूर्ण क्षमतेने प्रवास करता येईल.- उत्पादन निर्यात करणारे उद्योग, साखळी उद्योग, निरंतर प्रक्रिया उद्योग, डिफेन्स उद्योग, डेटा सेंटर, आयटी सेवा संबंधित उद्योग, उत्पादन क्षेत्रातील उद्योगांना नियमित परवानगी देण्यात आली आहे.
अत्यावश्यक सेवेत या बाबींचा समावेशसर्व वैद्यकीय सेवा, वाहतूक, पशुवैद्यकीय सेवा, सर्व वने संबंधित बाबी, हवाई सेवा, जीवनावश्यक वस्तू व सेवा, गोदाम, शीतगृहे, वृत्तपत्रे व माध्यमे, सार्वजनिक वाहतूक, रिझर्व्ह बँकेने घोषित केलेल्या सेवा, दूरसंचार, मालवाहतूक, पाणीपुरवठा, शेतीसाहित्य, पेट्रोल पंप, आयटी सेंटर्स व सेवा, वीज, गॅसपुरवठा, एटीएम, पोस्ट सेवा, शासकीय, खासगी सुरक्षा सेवा, ऑटोमोबाइल्स या अत्यावश्यक सेवा आहेत.
शहराची जबाबदारी मनपा प्रशासकांवरसर्व उद्योग, व्यवसाय व खासगी आस्थापनेतील कर्मचाऱ्यांना आरटीपीसीआरचा निगेटिव्ह अहवाल सोबत बाळगावा लागेल. याची वैधता १५ दिवसांसाठी असेल. या अहवालाविना दुकान-व्यवसाय सुरू करता येणार नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास दुकान सील करून दंड आकारण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. शहराची जबाबदारी मनपा प्रशासक पांडेय यांची राहणार आहे. नियंत्रक म्हणून जिल्हाधिकारी चव्हाण व तहसीलदार असतील.
१५ महिन्यांनंतर सिल्व्हर स्क्रीनची मजा२२ मार्च २०२० रोजी कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर सुरू झालेल्या लॉकडाऊनच्या निर्बंधांमुळे बंद असलेले सिनेमागृह ७ जून २०२१ पासून खुले होणार आहेत. १५ महिन्यांनंतर सिल्व्हर स्क्रीनची मजा घेता येईल. परंतु त्यासाठी कडक सूचनांचे पालन सिनेमागृह व्यवस्थापकांना करावे लागणार आहे.
काही ठळक मुद्दे असे...शासनाच्या वर्गवारीनुसार महापालिका हद्द पहिल्या स्तरात आहे.महापालिका हद्दीत रुग्णांचा पॉझिटिव्हिटी दर २.२४ टक्केऑक्सिजन सुविधा असलेले २२.१९ टक्के बेड्स रुग्णांनी व्यापलेले आहेत.७ जून रोजी सकाळी ७ वाजेपासून महापालिका हद्दीत सर्व काही सुरू होईल.