औरंगाबाद : घाटी रुग्णालयात कोरोना संशयित १६ वर्षीय पहिला रुग्ण बुधवारी (दि.११) दाखल झाला होता. त्याच्या लाळेच्या (स्वॅब) नमुन्यांचा तपासणी अहवाल पुणे येथील एनआयव्हीकडून शुक्रवारी (दि.१३) प्राप्त झाला. त्यात इन्फ्लुएंझा आणि सीओव्हीआयडी-१९ दोन्ही तपासण्या निगेटिव्ह आल्याने औरंगाबादकरांसह रुग्णाच्या नातेवाईक, घाटीतील डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
कोरोनाचा भयगंड असतानाच पहिला रुग्ण दाखल झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. १६ वर्षीय (रा. मीरपूर, उत्तर प्रदेश) मुलगा दिल्लीहून शहरात भावाला भेटण्यासाठी आला होता. प्रवासातून आल्यावर तो तापाने फणफणला आणि त्याचा गळाही बसला होता. शिवाय त्याला दम लागत होता. ही कोरोनाची लक्षणे असल्याने नातेवाईकांसह त्याने घाटी गाठली. त्याला रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याला भरती करून कोरोनाची लक्षणे दिसल्याने डॉ. सुंदर कुलकर्णी व त्यांच्या पथकाने लाळेचे नमुने घेऊन पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत पाठवले. शुक्रवारी दुपारी ४ च्या सुमारास एनआयव्हीचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे यांनी दिली. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या सूचनेप्रमाणे रुग्णास मेडिसिन इमारतीतीत आयसोलेशन वॉर्डात हलविण्यात आल्याचे मेडिसिन विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी सांगितले.
१०० खाटांच्या आयसोलेशन सेंटरची तयारी सीव्हीटीएस इमारतीत २२ खाटांचा वॉर्ड तयार केलेला असताना खबरदारीचा उपाय म्हणून घाटीत आणखी १०० खाटांच्या आयसोलेशन सेंटरची तयारी सुरू आहे. जुन्या मूत्रपिंडविकार विभागाच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्यातील ३१ खोल्यांसह चार वॉर्डांत ही व्यवस्था करण्यात येत आहे. त्यासाठी खाटांसह गाद्यांची व्यवस्था केली जात असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे, उपअधीक्षक डॉ. विकास राठोड म्हणाले. शिवाय ट्रिपल लेअर मास्कचा तुटवडा असल्याने वस्त्रभंडार विभागाला ५०० मास्क बनविण्याच्या सूचना दिल्या असून, पीपीडीऐवजी सध्या एचआयव्ही कीटचा वापर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
नोंदणी अन् खबरदारीवर लक्षवैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाशी समन्वय साधण्यासाठी नोडल आॅफिसर म्हणून उपअधिष्ठाता डॉ. मोहन डोईबळे यांची नेमणूक केल्याचे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले. डॉ. डोईबळे व डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी सीव्हीटीएस इमारतीला भेट देत मदत कें द्रातील मेडिसिनच्या निवासी डॉक्टरांना नोंदणी व खबरदारीसंदर्भात सूचना दिल्या, तसेच सध्या सीव्हीटीएस इमारतीत काम करणारे घाटीचे १५ व मिनी घाटीचे ५, अशा २० कर्मचाऱ्यांच्या ड्यूटी चार्टची माहिती इन्चार्ज सिस्टरकडून घेतली.च्संशयित रुग्णांना मिनी घाटीत पाठवताना किमान मास्क उपलब्ध करून देण्याची विनंती डॉक्टर करीत होते, तसेची पीपीडी व एन ९५ मास्कची मागणी परिचारिका व डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी डॉ. डोईबळे यांच्याकडे करून अडचणी सांगितल्या. त्यावर अडचणी सांगू नका. फक्त काम करा. रुग्णांना चांगली वागणूक द्या. नोंदी व्यवस्थित घ्या, असा सल्ला त्यांनी दिला.