औरंगाबाद : पीएम केअर फंडातून घाटीला मिळालेल्या १५० पैकी ८६ व्हेंटिलेटर शहरातील ४ खासगी रुग्णालयांना आणि अन्य ४ जिल्ह्यांना देण्यात आले. शहरातील ४ खासगी रुग्णालयांना दिलेल्या ३१ पैकी २२ व्हेंटिलेटर नादुरुस्त असून, वापराविनाच पडून असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या व्हेंटिलेटरचा रुग्णांना एकदाही वापर झालेला नाही. घाटीतील १४ व्हेंटिलेटरही नादुरुस्त असल्याची कबुली खुद्द घाटी प्रशासनाने दिली. खासगी आणि घाटीतील तब्बल ३६ व्हेंटिलेटर रुग्णांसाठी कुचकामीच ठरले. अन्य जिल्ह्यांत गेलेल्या ५५ व्हेंटिलेटरची काय अवस्था असेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
घाटी रुग्णालयात दाखल होणाऱ्या गंभीर कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे घाटीला व्हेंटिलेटरची गरज जास्त आहे. परंतु, मिळालेले व्हेंटिलेटर इतरांना वाटण्यात आले. वापरण्यायोग्य नसताना ते खासगी रुग्णालयांना देऊन प्रशासन मोकळे झाले. असे सदोष व्हेंटिलेटर परत पाठविणे, त्यांच्या दर्जाची चौकशी करण्याऐवजी रुग्णांना वापरण्याचा जीवघेणा अट्टाहास का केला जात आहे, कोणासाठी केला जात आहे, असाही प्रश्न निर्माण होत आहे.
‘सुपर स्पेशालिटी’त व्हेंटिलेटर पडून१५० पैकी ‘धवन-३’ची ५० व्हेंटिलेटर सुपर स्पेशालिटी ब्लाॅकच्या इमारतीत पडून आहेत. या व्हेंटिलेटरची खोकीही उघडण्यात आलेली नाहीत. एकीकडे रुग्णसंख्येमुळे घाटीतही अनेकांना व्हेंटिलेटर मिळत नाही, तर दुसरीकडे व्हेंटिलेटर मिळूनही त्याचा काहीही उपयोग होत नाही.
व्हेंटिलेटरच्या दर्जाचा प्रश्नप्राप्त व्हेंटिलेटर हे वापरण्यायोग्य नसल्याचे काही तज्ज्ञांनी स्पष्टपणे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. हे व्हेंटिलेटर वापरण्यायोग्य होते तर मग घाटीतच का नाही वापरले. कारण, घाटी प्रशासनाला व्हेंटिलेटरच्या अवस्थेची कल्पना पहिल्याच दिवशी आली होती.
कोणत्या आधारावर वाटप? काय गौडबंगाल?खासगी रुग्णालयांना कोणत्या आधारावर व्हेंटिलेटर देण्यात आले, याची स्पष्टता कोणीही करत नाही. खासगी रुग्णालयांनी मागणी केली असेल तर मग त्यांना पीएम फंडातील आणि घाटीने नाकारलेले व्हेंटिलेटरच का देण्यात आले, व्हेंटिलेटर देताना त्यांच्या अवस्थेची माहिती खासगी रुग्णालयांना देण्यात आली का, व्हेंटिलेटर वाटपाची माहिती गुप्त का ठेवण्यात आली. यामागे काय गौडबंगाल आहे, हा प्रश्न निर्माण होत आहे.
१४ महिन्यांत सिस्टीम लागलीच नाहीगेल्या १४ महिन्यांपासून कोरोना प्रादुर्भावाला सामोरे जावे लागत आहे. विभागीय आयुक्तालय, जिल्हाधिकारी कार्यालय, आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सक, अधिष्ठाता, अशी कार्यालये आणि वरिष्ठ अधिकारी शहरात आहेत. तरीही व्हेंटिलेटर कसे आहेत, त्यांची खरी गरज कोणाला आहे, कोणाला किती दिले, यावर देखरेख ठेवून वाटप करण्याची सिस्टीम अद्यापही लागलेली नाही.
इंजिनिअर घाटीत दाखलघाटीत बंद अवस्थेत असलेल्या १४ व्हेंटिलेटरची तपासणी करण्यासाठी बुधवारी इंजिनिअर आले आहेत. हे व्हेंटिलेटर दुरुस्त झाले तरच सध्या खोक्यात बंद असलेल्या ५० व्हेंटिलेटर वापरण्याचा विचार केला जाईल, असे अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर यांनी सांगितले.
गुजरातमध्ये धमन व्हेंटिलेटर पडले होते वादातगुजरातच्या ज्योती सीएनसी या कंपनीने बनवलेल्या धमन-१ व्हेंटिलेटर रुग्णांसाठी उपयोगी ठरत नसल्याचे मे २०२० मध्ये अहमदाबादमधील सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या निदर्शनास आले होते. राजकोटमधील या कंपनीबाबत एक पत्र डॉक्टरांनी उपमुख्यमंत्र्यांना लिहिले होते. कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढ्यात अतिमहत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या व्हेंटिलेटरवरून गुजरातमध्ये वाद सुरू झाला होता. या व्हेंटिलेटरवरून तेव्हा तेथे चांगलेच राजकारण पेटले होते.
१०० व्हेंटिलेटरचे असे झाले वितरणरुग्णालयाचे, जिल्ह्याचे नाव- व्हेंटिलेटरची संख्या--हिंगोली- १५ नग-उस्मानाबाद - १५ नग-बीड- १० नग-परभणी - १५ नग-एमजीएम रुग्णालय- २० नग-युनायटेड सिग्मा हाॅस्पिटल-५ नग-पॅसिफिक हाॅस्पिटल, हिमायतबाग- ३ नग-एच.एम.जी. हॉस्पिटल, कटकट गेट- ३ नग- घाटी रुग्णालय- १४ नग
एमजीएम रुग्णालयात ११ व्हेंटिलेटर बंदएमजीएम रुग्णालयास २० व्हेंटिलेटर प्राप्त झाल्याची माहिती उपअधिष्ठाता डाॅ. प्रवीण सूर्यवंशी यांनी दिली. यातील ११ व्हेंटिलेटर बंद असल्याचे रुग्णालयाचे डाॅ. एच. आर. राघवन यांनी सांगितले. यासंदर्भात व्हेंटिलेटरच्या इंजिनिअर्ससोबत संपर्क साधण्यात आला; परंतु कोणीही येत नाही. ऑक्सिजन फ्लो सेन्सर प्रत्येक रुग्णानंतर बदलावे लागतात. तेही मिळत नसल्याचे डाॅ. राघवन यांनी सांगितले.
एचएमजी हॉस्पिटलमध्येही वापरच नाहीकटकट गेट परिसरातील एच. एम.जी. हॉस्पिटलला ३ व्हेंटिलेटर देण्यात आले. हे व्हेंटिलेटर रुग्णालयात सध्या वापरात नसल्याची माहिती रुग्णालयाचे डाॅ. शोएब हाश्मी यांनी दिली. रुग्णालयात आल्यापासून हे व्हेंटिलेटर वापरात नाही.
पॅसिफिक हाॅस्पिटलमध्येही व्हेंटिलेटर पडूनचहिमायत बाग परिसरातील पॅसिफिक हाॅस्पिटललाही ३ व्हेंटिलेटर देण्यात आले. एकाही रुग्णाला आतापर्यंत हे व्हेंटिलेटर लावण्यात आलेले नाही, असे रुग्णालयाचे डाॅ. अश्फाक अन्सारी यांनी सांगितले. ऑक्सिजन सेन्सर नाही. त्यामुळे ‘लो प्रेशर ऑक्सिजन’ असे व्हेंटिलेटर दाखविते. त्यामुळे त्याचा वापर करता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.
सिग्मा हॉस्पिटलला व्हेंटिलेटरच निरीक्षणाखालीपीएम केअर फंडातील ५ व्हेंटिलेटर युनायटेड सिग्मा हॉस्पिटलला देण्यात आले. यातील ३ व्हेंटिलेटर चालू नव्हते, ते परत करून अन्य ३ व्हेंटिलेटर घेण्यात आले. व्हेंटिलेटरसाठी ऑक्सिजन सेन्सर लागते. काही व्हेंटिलेटरला ते नव्हते. हे व्हेंटिलेटर सध्या निरीक्षणाखाली (अंडर ऑब्जर्वेशन) आहेत. स्थानिक पातळीवर तांत्रिक सहाय मिळत नाही. त्यामुळे रुग्णांना वापरण्यास अजून सुरुवात केलेली नाही, एक ते दोन दिवसांत वापर सुरू होऊ शकतो, असे रुग्णालय प्रशासनातर्फे सांगण्यात आले.