औरंगाबाद : बंगळुरू येथील मायलॅन कंपनीने मागील महिन्यात औरंगाबाद महापालिकेला ६५० रुपयांमध्ये १०० मिलिग्रॅम (एमजी)चे १० हजार इंजेक्शन्स उपलब्ध करून दिले. आता कंपनीने दोन दिवसांपासून रेमडेसिविरसाठी १४०० रुपये दर आकारला आहे. असे असताना केंद्र सरकारने जाहीर केलेले मायलॅनच्या इंजेक्शनचे दर ३ हजार ४०० रुपये कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महाराष्ट्रात सध्या रेमडेसिविर इंजेक्शनची गरज खूप मोठ्या प्रमाणात भासत आहे. महाराष्ट्र शासनाने देशभरातील विविध उत्पादन कंपन्यांकडून इंजेक्शनचे दरपत्रक मागविले. त्यावरून शासनाला देण्यात आलेल्या दरामध्ये मोठी तफावत असल्याचे उघडकीस आले आहे. बंगलोर येथील मायलॅन कंपनीने मागील महिन्यात औरंगाबाद महापालिकेला १०० एमजीचे रेमडेसिविर इंजेक्शन अवघ्या ६५० रुपयांमध्ये जीएसटीसह दिले. १० हजार इंजेक्शन्स महापालिकेने थेट कंपनीकडून खरेदी केली. महापालिकेने कंपनीला आणखी ऑर्डर दिली असता, आता दर १४०० रुपये दर सांगण्यात आला. मुंबई महापालिकेनेही याच दरानुसार इंजेक्शन्स घेतल्याची माहिती कंपनीने महापालिकेला दिली.
आता महापालिकेने १४०० रुपये दराने इंजेक्शन खरेदीची तयारी सुरू केली आहे. मात्र, जे इंजेक्शन औरंगाबाद महापालिकेला १४०० रुपये दराने मिळत आहे. त्याची किंमत केंद्र सरकारने ३४०० रुपये कशाच्या आधारावर जाहीर केली, असा प्रश्न वैद्यकीय क्षेत्रातून उपस्थित होत आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून रेमडेसिविरबाबत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. इंजेक्शन मिळविण्यासाठी अनेक ठिकाणी नातेवाईक रांगा लावत आहेत. काळ्याबाजारानेही इंजेक्शनची विक्री सुरू झाली, या परिस्थितीत रेमडेसिविरच्या इंजेक्शनमधून नागरिकांची लूटच होण्याची शक्यता दिसत आहे.
काही कंपन्यांनी दर कमी केलेसिप्ला, मायलॅन या कंपन्यांनी सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन आणि मानवीय दृष्टिकोन समोर ठेवून इंजेक्शनची किंमत अत्यंत कमी ठेवली आहे. सिप्ला ८००, तर मायलॅन १४०० मध्ये इंजेक्शनची विक्री करीत आहे. केंद्र शासनाकडून आलेले दर कसे आणि कुठून आले हे माहीत नाही.- डॉ. जावेद मुकर्रम, वैद्यकीय क्षेत्रातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ.
१४०० रुपयांनी आणखी दहा हजारांचे बुकिंगबंगलोर येथील मायलॅन कंपनीने इंजेक्शनचे दर वाढविले असले तरी अजून ते १४०० रुपयांपर्यंतच आहेत. महापालिकेने आणखी दहा हजार इंजेक्शन्सची ऑर्डर बुक केली आहे. लवकरच हा साठा महापालिकेला उपलब्ध होईल शक्यता आहे.- डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा.