- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे रुग्णालयांतील खाटांबरोबर कार्यरत मनुष्यबळही अपुरे पडत आहे. परिणामी, आरोग्य यंत्रणेवर ताण वाढत आहे. एकट्या घाटीत तज्ज्ञ डाॅक्टरांसह ५५२ आरोग्य कर्मचाऱ्यांची गरज आहे, तर ग्रामीण भागासाठी ८७ डाॅक्टर्स, परिचारिकांची आवश्यकता आहे. अपुऱ्या मनुष्यबळाच्या जोरावर कोरोना रुग्णसेवा देण्याची कसरत करण्याची वेळ आरोग्य यंत्रणेवर ओढावत आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या आजघडीला १५ हजारांवर गेली आहे. त्यात दररोज दीड हजारांच्या घरात नव्या रुग्णांची भर पडत आहे. रुग्णसंख्येच्या तुलनेत कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. त्यात वाढीव खाटांसाठी आणखी मनुष्यबळ लागणार आहे. जनरल वॉर्ड हा साधारणपणे २० खाटांचा असतो. एका दिवसात (२४ तास) २० रुग्णांना सेवा देण्यासाठी कमीत कमी ४ परिचारिका, २ वॉर्ड बाय, एक वॉर्ड मावशी, एक ज्युनिअर डॉक्टर कार्यरत असतात, तर एक कन्सल्टंट डॉक्टर हे रुग्णास कमीत कमी २ वेळेस तपासणीसाठी येतात. त्याशिवाय रुग्णांना शिफ्ट करणारे कर्मचारी, सफाई कर्मचारी, पॅथॉलॉजी, रॅडिओलॉजी, बायामेडिकल वेस्ट संकलन करणारे कर्मचारी लागतात. आवश्यक मनुष्यबळासाठी कंत्राटी तत्त्वावर पदे भरली जात आहेत; परंतु कंत्राटी तत्त्वावर रुजू होण्यास अल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मनुष्यबळ आणायचे कुठून, असा प्रश्न शासकीय रुग्णालयांबरोबर खाजगी रुग्णालयांनाही भेडसावत आहे. खाजगी रुग्णालयातील स्पेशालिस्ट डाॅक्टरांनी घाटीत सेवा भावनेने रुग्णसेवा द्यावी, असे आवाहन घाटी प्रशासनाने केले आहे. ग्रामीण भागासाठी २१ डाॅक्टर्स आणि ६६ स्टाफ नर्सची आवश्यकता असल्याचे जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ. सुधाकर शेळके यांनी सांगितले.
पदे भरण्याची प्रक्रिया सुरूघाटी रुग्णालयात खाटा वाढविण्यात येत आहेत. त्यामुळे वाढीव मनुष्यबळ लागणार आहे. काही पदे मंजूर झाली आहेत. ही मंजूर पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आणखी काही पदांसाठी प्रस्ताव पाठविला आहे. या प्रस्तावात स्पेशालिस्ट डाॅक्टरांची पदे आहेत.- डाॅ. वर्षा रोटे, प्रभारी अधिष्ठाता, घाटी
एकूण कोरोनाबाधित-८०,०२१बरे झालेले-६२,७०२सध्या उपचार सुरू असलेले-१५,७०६कोरोना बळी-१६०८
आवश्यक असलेले मनुष्यबळ : इंटेन्सिव्हिस्ट-१०भूलतज्ज्ञ-१०जनरल फिजिशियन-१०चेस्ट फिजिशियन-१०ड्यूटी मेडिकल ऑफिसर- २०जनसंपर्क अधिकारी-६समुपदेशक (एमएसडब्ल्यू)-५स्टाफ नर्स-२६६बायोमेडिकल इंजिनिअर-२रेडिओलाॅजी तंत्रज्ञ- १५ऑक्सिजन व्यवस्थापन कर्मचारी-५स्टेनो कम क्लर्क-४रुग्णवाहिकाचालक-५डाॅक्टर्स (ग्रामीणसाठी) -२१सफाईगार-२५०