- योगेश पायघन
औरंगाबाद : सध्या कोरोनाचा कहर सुरू असून, औरंगाबादेतही रुग्ण आढळून आला आहे. या आजाराला रोखण्यासाठी प्रत्येकाने सुरक्षितपणे काळजी घेतली तर कोरोनापासून आपण दूर राहू शकतो. हा साथीचा आजार असल्याने हाताद्वारे लगेच त्याची बाधा होण्याची शक्यता असते. त्यासाठी योग्य पद्धतीने आणि साबणाने हात धुतले तरी चालणार आहे. त्यासाठी महागडे सॅनिटायझर घेण्याची काहीच गरज नाही.
हात स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिक सॅनिटायझर विकत घेण्यावर भर देत आहेत. कारण त्यामुळे हात स्वच्छ ठेवले जातात. परंतु केवळ साबणाने हात स्वच्छ आणि योग्य प्रकारे धुतले तरी कोरोनापासून दूर राहता येते, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे विनाकारण महागडे सॅनिटायझर घेण्याची गरज नाही. हात स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. कारण कोरोना बाधितांद्वारे कोरोना विषाणू कुठेही लागू शकतो. तो विषाणू लागून आपल्याला त्याची बाधा होऊ शकते. म्हणून हाताची योग्य स्वच्छता घ्यावी, असे डॉक्टरांनी सांगितले.
‘कोविड-१९’ विषाणूशी लढण्याचे सर्वांत प्रभावी शस्त्र-वारंवार हात धुणे‘कोविड-१९’ या विषाणूला एक मेद आवरण असते. ज्यामुळे तो संसर्ग करू शकतो. साबणाने हात धुण्यामुळे हे मेद आवरण विरघळण्यास मदत होते. ज्यामुळे हा विषाणू संसर्ग करीत नाही. म्हणून वारंवार साबणाने हात धुणे हे प्रभावी शस्त्र आहे, असे डॉ. ज्योती बजाज-इरावणे यांनी सांगितले.
लहान मुलांची काळजी बदलणारे हवामान, बदलली जीवनशैली, चुकीच्या पद्धतीने घेतलेला आहार आणि व्यायामाचा अभाव, या कारणांनी प्रतिकारक्षमतेवर परिणाम होऊन सर्दी, खोकला, ताप, पोट बिघडणे, अशा कितीतरी आजारांना तोंड द्यावे लागते. कोरोना व्हायरसमुळे सध्या अशाच स्वरुपाची लक्षणे दिसून येत आहेत. वाहती सर्दी, घसादुखी, कफ, खोकला, ताप अशा स्वरुपाची लक्षणे दिसून येतात. लहान मुलांमध्ये प्रतिकारक्षमता मुळात कमी असते. मोठ्या व्यक्ती, वृद्धांनी तर काळजी घ्यायचीच, पण लहान मुलांचे वय, खेळकर वृत्ती, क्लासेसच्या निमित्ताने जाणे-येणे यामुळे विशेष काळजी घेणे आवश्यक असते. लहान मुले हात कुठेही लावत असतात म्हणून त्यांची दक्षता घ्यावी.
घसा दुखत असेल, तर करा हे उपाय सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सर्दी, ताप, खोकला इ. लक्षणांकडे दुर्लक्ष न करता त्वरित औषधी सुरू करावी. अत्यंत सोपा सहज उपाय म्हणजे लगेच गरम पाणी पिण्यास घ्यावे. घसा दुखत असेल तर आराम पडतो. मिठाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात. तुळशीची ४-५ पाने स्वच्छ धुऊन घेऊन ग्लासभर पाण्यात घालावीत. गवती चहा, दालचिनीचा छोटा तुकडा घालून ते पाणी उकळावे. गरम स्वरुपात पिण्यास द्यावे. आल्याचा सर व मध हे चाटण २-३ वेळा दिल्यास कफ कमी होण्यास मदत होते. सितोपलादी चूर्ण १/२ चमचा आणि ज्येष्ठमध १/४ चमचा एकत्र करून मधासह चाटण दिल्यास घशाला आराम मिळतो.
सर्दी, खोकला कमी होण्यासाठी पिंपळी पावडर, ज्येष्ठ मध पावडर, सितोपलादी चूर्ण (सर्व १/२ चमचा) एकत्र करून गरम पाण्याबरोबर किंवा मधासह एकत्र करून दिल्यास सर्दीसाठी चांगला उपयोग होतो. सर्दीची सुरुवात नेमकी झाल्यास त्वरित दिले तर सर्दी वाढत नाही. लवंग भाजून चघळल्यास खोकला कमी होतो. मुलांना खडीसाखर आणि लवंग चघळण्यास द्यावी.
ताप, अंगदुखीवर काय करावे ? पारिजातकाची पाने मिळाल्यास २/३ पाने स्वच्छ धुवून २ कप पाण्यात घालून उकळून ते पाणी सेवन केल्यास ताप कमी होतो. पाने न मिळाल्यास पारिजातक वटी, तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार मात्रा ठरवून घ्यावी. अंगदुखी, तापाला आराम मिळतो. लक्षणे वाढली तर डॉक्टरांकडे त्वरित जा.
हस्तांदोलन टाळाआयुर्वेदातही जनपद ध्वंश ही उपचार पद्धती पुरातन काळापासून वापरात आहे. यात बाहेरून येणाऱ्या व्यक्तींचे विलगीकरण करण्यात येत होते. तसेच बाहेरून आल्यावर निंबाची पाने टाकून हात-पाय धुण्याची पद्धत आजही दिसते. साथीच्या आजारात स्वच्छतेला खूप महत्त्व आहे. जेवणाआधी, बाहेरून आल्यावर विशेषकरून मुलांच्या हात धुण्यावर लक्ष दिले पाहिजे. हस्तांदोलन टाळा. सर्दी, शिंका, खोकला असेल तर साधा रुमाल वापरणे, बांधणेही पुरेसे आहे. त्यासाठी महागडे मास्क घेण्याची गरज नाही. कपड्यांसह, सोबत्याची बॅग, नेहमी हाताळण्यात येणाऱ्या वस्तूंच्या स्वच्छतेची दक्षता घ्या. -डॉ. रवींद्र खरात, सहायक प्राध्यापक व आयुर्वेद तज्ज्ञ
वारंवार हात धुणे का आहे आवश्यक?‘कोविड-१९’ या विषाणूचा प्रसार कुठेही होऊ शकतो. गर्दीच्या ठिकाणी कोण संशयित आहे हे सांगणे कठीण आहे. मात्र, एरव्ही प्रत्येक आजाराला आपण हाताच्या स्वच्छतेला प्राधान्य देतो. त्यामुळे अपायकारक बॅक्टेरिया, विषाणूंचा सफाया होतो. बाधित रुग्णाच्या शिंकेतून, खोकल्यातून बाहेर पडलेला विषाणू वस्तू अथवा कपड्यावर आठ ते बारा तास जगतो. तेथे हात लागल्यावर या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे वारंवार चेहरा, नाक, डोळ्यांना हात लावणे टाळले पाहिजे. संसर्ग टाळण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून वारंवार हात धूण्याची सवय लावून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी साबण आणि पाणीही पुरेसे आहे. - डॉ. ज्योती बजाज-इरावणे, विभागप्रमुख, सूक्ष्मजीवशास्त्र, घाटी रुग्णालय
२० सेकंद हात घासावेत निर्जंतुकीकरण होईल असा कोणताही साबण आणि स्वच्छ पाणी हात धुण्यासाठी वापरावा. पाणी नसेल अशा ठिकाणी सॅनिटायझर वापरू शकता. साबण उत्तम प्रकारे निर्जंतुकीकरण करू शकते. मात्र, हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझरच पाहिजे असा आग्रह नको. हात २० सेकंद पाण्याखाली एकमेकांवर घासून धुवावेत. जेणेकरून हाताचा प्रत्येक भाग स्वच्छ होईल. -डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, घाटी रुग्णालय
हात धुण्याची शास्त्रशुद्ध पद्धत - वाहत्या पाण्यात हात ओले करावेत - पुरेसा साबण हातावर घ्यावा. - हाताला मागून-पुढून व बोटांच्या मधल्या भागात कमीत कमी २० सेकंद चोळावे. - स्वच्छ पाण्याने हात व्यवस्थित धुवावेत - स्वच्छ टॉवेलने हात कोरडे करावेत.
हात केव्हा-केव्हा धुवावेत? - शिंक किंवा खोकला आल्यावर आणि नाक शिंकरल्यावर. - सार्वजनिक ठिकाणी जाऊन आल्यानंतर. - आजारी व्यक्तींना भेटण्याआधी व भेटल्यानंतर. - खाण्यापूर्वी व जेवणापूर्वी व जेवणानंतर.- टॉयलेटचा वापर केल्यानंतर.- पाळीव प्राण्यांना हाताळल्यावर. - लहान मुलांना हात धुण्यासाठी प्रोत्साहन देऊन त्यांना हात धुणे सहज शक्य होईल, अशी व्यवस्था करून द्यावी.