औरंगाबाद : अहमदनगर जिल्ह्यातीलच रहिवासी, पण दिवसभर शोधूनही ८४ वर्षीय कोरोनाबाधित आजींना बेड मिळाला नाही. त्यामुळे आजींना घेऊन नातेवाईकांनी औरंगाबादेत धाव घेतली. तेथे अवघ्या ५ दिवसात आजींची प्रकृती सुधारली आणि त्या ‘आयसीयू’तून बाहेर आल्या. या आजींना सोमवारी जिल्हा रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तेव्हा भरल्या डोळ्यांनी त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले. हे कर्मचारी ईश्वराप्रमाणे असल्याची भावना नातेवाईकांनी व्यक्त केली. भीमाबाई चंद्रभान तुपे असे कोरोनावर मात करणाऱ्या आजींचे नाव आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील त्या रहिवासी आहेत. दम लागत असल्याने आणि ताप आल्याने १६ एप्रिल रोजी त्यांची तपासणी करण्यात आली, तेव्हा कोरोनाचे निदान झाले. त्यांची ऑक्सिजन पातळी ८५ होती. त्यामुळे तात्काळ रुग्णालयात भरती होण्यास सांगण्यात आले. नातेवाईकांनी अहमदनगरमध्ये दिवसभर शोध घेतला, परंतु त्यांना बेड मिळाला नाही. मोठ्या आशेने नातेवाईकांनी त्यांना घेऊन औरंगाबादेत धाव घेतली. पण येथेही दोन तास फिरल्यानंतर एका रुग्णालयात ऑक्सिजन बेड मिळाला. पण त्यांना रेमडेसिविर इंजेक्शन लागणार आहे, परंतु ते उपलब्ध नसल्याचे रुग्णालयाने सांगितले. नातेवाईकांनी दोन दिवस शोध घेतला, पण इंजेक्शन मिळाले नाही. त्यामुळे नातेवाईकांनी आजींना जिल्हा रुग्णालयात भरती केले. याठिकाणी रेमडेसिविरही मिळाल्याने नातेवाईकांच्या जिवात जीव आला. ऑक्सिजन पातळी वाढल्यानंतर त्यांना जनरल वाॅर्डात हलविण्यात आले. त्यांची ऑक्सिजन पातळी १०० वर आली. दम लागणे कमी झाले. त्यांना सोमवारी सुटी देण्यात आली.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अश्विन पाटील, डॉ. गायकवाड, डॉ. स्मिता चव्हाण, डॉ. विपिन राठोड, इन्चार्ज सिस्टर मीना खंडागळे, कुसुम भालेराव, जनाबाई मुंडे, शांता गंज्जेवार, पल्लवी मुथा, पूजा कुंभारे, मंगल कुऱ्हाडे, स्नेहा वाघमारे, अनिता मस्के, सुजाता घुगे आदींनी उपचारासाठी परिश्रम घेतले.
आरोग्य सेवेचे वारकरीकर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण असूनही हे आरोग्य सेवेचे वारकरी रात्रीचा दिवस करून कोरोना रुग्णांना जीवदान देत आहेत. या डॉक्टररूपी परमेश्वरांचे मनस्वी खूप खूप आभार. नगरमध्ये दिवसभर शोधूनही माझ्या आजीला बेड मिळाला नाही. पण औरंगाबादेत बेड मिळाला. आजी बऱ्या झाल्या आणि आज घरी परतल्या. हे सर्व जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमुळे शक्य झाले.- सुनील भडके, नातेवाईक