औरंगाबाद : शहरात ३०० ते ३५० रुग्ण आढळून आले तर विदर्भातील जिल्ह्याप्रमाणे औरंगाबादेत सर्वत्र लॉकडाऊन लावण्यात येणार नाही. ज्या भागात नागरिकांची सर्वाधिक गर्दी होत आहे, ज्या ठिकाणी रुग्णमोठ्या संख्येने आढळून येत आहेत, तेथे संचारबंदी लावण्यात येईल, असा इशारा महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगळवारी दिला.
शहरातील कोरोनाबाधितांची संख्या कमी-जास्त होत आहे. सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना लॉकडाऊनची भीती वाटत आहे. या संदर्भात पत्रकारांनी पाण्डेय यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, संपूर्ण शहर लॉकडाऊन केले पाहिजे असे नाही. शहराच्या एका भागात देखील लॉकडाऊन केले जाऊ शकते. त्यामुळे शहराच्या ज्या भागात गर्दी जास्त आहे आणि बाधितांची संख्या देखील जास्त आहे, त्या भागात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. शहरातील कोरोनाबाबतच्या परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत.
कठोर निर्णय हिताचे ठरत आहेतशहरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे, ही बाब लक्षात घेऊन शाळा, कॉलेज आणि कोचिंग क्लासेस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मंगल कार्यालयांवर कडक निर्बंध घातले आहेत, त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. १९ फेब्रुवारी रोजी १४३ कोरोनाबाधित होते. २० फेब्रुवारी रोजी ही संख्या १२० होती. २२ फेब्रुवारी रोजी २१३, तर २३ फेब्रुवारी रोजी २१९ रुग्ण आढळले होते. त्यामुळे आता विनामास्क फिरणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई करण्याचे ठरविले आहे. गेल्या वर्षी या आजाराला वैश्विक महामारीचे स्वरूप होते. आता तसे स्वरूप राहिलेले नसले तरी हा आजार गंभीर स्वरूपाचा आहे हे मात्र निश्चित. लसीकरणाच्या नंतर २०२२ मध्ये हा आजार सामान्य होईल असेही ते म्हणाले.
शहरात किमान ३० लसीकरण केंद्रेज्या भागात कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे असे लक्षात येईल, त्या भागात लसीकरणाचे केंद्र सुरू केले जाईल. येत्या काही दिवसांत शहरात किमान ३० ठिकाणी लसीकरणाचे केंद्र सुरू करण्याचे नियोजन केले जात आहे, अशी माहिती पाण्डेय यांनी दिली.