औरंगाबाद : चीनच्या मासळी बाजारातून कोरोना व्हायरस झाला, असे सांगितले जात असले तरी चीन १९९३ पासून गुपचूप बायो वेपन तयार करीत होता, त्या लॅबमधून कोरोनाचा व्हायरस पसरला असल्याचे खळबळ जनक प्रतिपादन आंतरराष्ट्रीय धोरणाचे प्रसिद्ध अभ्यासक शरद देवळाणकर यांनी केले.
जीवन विकास ग्रंथालयाच्या ४७ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘मोदींचे परराष्ट्र धोरण : सातत्य, स्थित्यंतर आणि आव्हाने’ यावर ते बोलत होते. ग्रंथालयाचे अध्यक्ष माजी न्या. अंबादास जोशी यांनी त्यांचे स्वागत केले. श्रीकांत उमरीकर यांनी सूत्रसंचालन केले व आभारही मानले. यावेळी प्रश्नोत्तरेही रंगली.
पुढे बोलताना ते म्हणाले, चीन १९९३ पासून गुपचूप बायो वेपन तयार करीत होता, त्या लॅबमधून कोरोनाचा व्हायरस पसरला, हे वेपन कुणाविरुद्ध वापरला जाऊ शकले असते, तर अर्थातच भारताविरुद्ध. चीनमध्ये या कोरोनामुळे ७० हजार कंपन्या बंद पडलेल्या आहेत. मात्र, ते हे जाहीर करीत नाहीत. या कंपन्या बंद पडल्यामुळे आणि चीनच्या स्वस्त वस्तू भारतात येणे बंद झाल्यामुळे महागाई वाढणार, हे निश्चित. ५७ अब्ज डॉलर्सच्या वस्तू भारत चीनकडून खरेदी करत असल्याचेही त्यांनी सांगितले
चीनच्या पलीकडे आपली परराष्ट्रनीती जात नाहीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे निदान परराष्ट्र धोरणावर चर्चा तरी सुरू झाली. नाही तर आपली परराष्ट्र धोरणाबद्दलची रुची पाक-चीनच्या पुढे जात नाही. मोदींनी आतापर्यंत ८२ देशांचे दौरे केले. दौऱ्यांच्या फलश्रुतीपेक्षा खर्च किती झाला यावरच चर्चा जास्त होते. भारतात परराष्ट्र धोरणाचे लोकशाहीकरण झाले नाही. ते लोकांपर्यंत पोहोचत नाही, याबद्दलची खंत देवळाणकर यांनी व्यक्त केली.
मोदींच्या दौऱ्यांमुळे ३२० अब्ज डॉलर्स भारतात २०१४ ते २०२० यादरम्यान मोदींनी केलेल्या परदेश दौऱ्यांवर ४४६ कोटी रु. खर्च झाले. अमेरिका- रशियाच्या प्रमुखांच्या १० टक्केही दौरे मोदी करीत नाहीत. मागील पाच वर्षांत मोदींच्या दौऱ्यांमुळे ३२० अब्ज डॉलर्स भारतात आले. त्या तुलनेत दौऱ्यांवर झालेला खर्च नगण्यच आहे, असे त्यांनी नमूद केले. आण्विक उत्तरदायित्व विधेयक संसदेत संमत होत नाही तोपपर्यंत भारतात न्युक्लिअर प्लँट लागणार नाहीत, असेही ते म्हणाले.