औरंगाबाद : विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी कोरोनावरून मराठवाड्यातील अधिकाऱ्यांची अक्षरशः खरडपट्टी काढली. व्हायरल झालेल्या एका ऑडिओ क्लिपमधून ही बाब समोर आली आहे. हिंगोली, परभणी जिल्हाधिकाऱ्यांसह औरंगाबाद, बीड, नांदेड येथील अधिकाऱ्यांची केंद्रेकर यांनी चांगलीच कानउघाडणी केली. निष्काळजीपणाने काम करू नका, झोपा काढता काय, त्याच त्याच सूचना द्यायला लावू नका, कामाला लागा, अशा शब्दात त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना सुनावले.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाने विविध उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. या सगळ्यात सुनील केंद्रेकर यांनी मराठवाड्यातील अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्या, त्याची ऑडिओ क्लिप सामाजिक माध्यमात व्हायरल झाली. या क्लिपमधील सुनील केंद्रेकर यांनी साधलेला संवाद त्यांच्या शब्दांत.
मंगल कार्यालयांविषयी काय म्हणाले...एक-एक मंगल कार्यालयांवर रेड करा. त्यांना नोटीस द्या आणि फाईन लावायला सुरुवात करा. जर तिथे विनामास्क, परवानगीपेक्षा जास्त लोक आढळले, तर कारवाई करा. पहिली नोटीस गेली पाहिजे. दंड लावला पाहिजे. पोलीस केस दाखल करू म्हणून नोटीसमध्ये उल्लेख करावा. दुसऱ्यावेळी सापडले तर गुन्हे दाखल करा व १५ दिवसांसाठी सील करा.
कोचिंग क्लासेसविषयी काय म्हणाले...कोचिंग क्लासेसवर जाऊन रेड करा. दंड लावा. मुलांनी मास्क लावले की नाही, सॅनिटायझरची व्यवस्था आहे की नाही, ते पहा आणि सगळ्यांना नोटीस द्या. दुसऱ्यावेळी सापडले तर कोचिंग क्लासेससुद्धा सील करावे लागतील. बाकीचे क्लोज स्पेसेस आहेत तेथेही ताबडतोब कारवाई करा. हे अर्जंट आहे. कारण स्पाईकची भीती सध्या दिसत आहे. काही डॉक्टरांचे म्हणणे आहे, नवीन स्ट्रेन आला आहे. ते नाही म्हणतात. पण काही ठिकाणी आढळले की नवीन स्ट्रेन आहे.
हिंगोली, परभणी जिल्हाधिकाऱ्यांना काय म्हणाले...हिंगोली, परभणी जिल्हाधिकाऱ्यांना माझी सूचना आहे. तुमच्याकडचे फीडबॅक येत आहे. मोठमोठी लग्न होत आहेत आणि काहीही कारवाई होत नाही. औरंगाबादमध्येही हीच परिस्थिती आहे. लग्न होत आहेत आणि सगळे झोपा काढत आहेत. मला ही कारवाई तत्काळ पाहिजे.
खासगी डॉक्टरांविषयी बोलले...जे खासगी डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे सर्दी, खोकला, ताप, फ्लू स्वरूपातील लक्षणे घेऊन रुग्ण जातात. हे डॉक्टर त्यांना तपासणी करायला सांगत नाहीत. सगळ्या डॉक्टरांना लिखित स्वरूपात वाॅर्निंग द्या की, कोविड स्वरूपातील लक्षणे असतील तर टेस्ट करणे बंधनकारक असेल. नॉर्मल फ्लू, नॉर्मल फिव्हर आहे, असे म्हणून रुग्णांना घरी पाठवायचे, हे चुकीचे आहे.
विनामास्क फिरणाऱ्यांवर काय कारवाई...लोक विनामास्क फिरली तर दंड केला जाईल. काही ठिकाणी रुग्ण, सर्दी, पडसे, फ्लू स्वरूपातील लोक विनाप्रोटेक्शन फिरले तर त्यांच्यावर साथरोग कायद्याखाली स्प्रिंडिंग केले म्हणून गुन्हे दाखल होतील.
मला माहीत नाही परभणीचा काय प्रॉब्लेम आहे...परभणीत कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अत्यंत कमी (पुअर) आहे. मला माहीत नाही परभणीचा काय प्रॉब्लेम आहे. परभणी जिल्हाधिकारी यांना दहावेळा ही गोष्ट सांगून झाली. शेवटी आहे तेथेच आहे. कृपा करून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा. माझ्याकडे जे रिपोर्ट आहेत, त्यात तुमचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग ९ आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कुठल्याही परिस्थितीत कोणत्याही जिल्हाधिकाऱ्यांचा २०च्या खाली आला नाही पाहिजे.
हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी...हिंगोली आणि बीड यांचे टेस्टिंगसुद्धा कमी आहे. हिंगोली जिल्हाधिकारी यांनी दक्षता घ्यावी. कामाचे काल कौतुक झाले; पण टेस्टिंग जर नसेल तर चालणार नाही. टेस्टिंग झाले पाहिजे.
लातूर, बीडची जास्त काळजीलक्षात ठेवा, पुन्हा सेकंड व्हेव मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृपा करून निष्काळजीपणाने काम करू नका. त्याच-त्याच सूचना, मागे लागा, टेस्टिंग करा, आरटीपीसीआर जास्त करा, हे बोलायला लावू नका. मी वरिड (काळजी) आहे. लातूर, बीड आणि नांदेडही जास्त व्हस्ट होत आहे. परभणीचे ‘सिव्हील’चे प्रशासन आणि टेस्टिंग बोगस आहे. मी समाधानी (हॅपी) नाही. त्याकडे त्यांनी जास्त लक्ष द्यावे.