औरंगाबाद: कोरोना प्रतिबंधक लस घेऊन शहरात ६ लाख नागरिक ‘लसवंत’ झाले आहेत. मात्र दुसरा डोस घेण्यासाठी ४५ हजार नागरिकांना लसींची प्रतीक्षा कायम आहे. आणखी ५ लाख ७७ हजार नागरिकांचे लसीकरण होणे बाकी असल्याचे मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.
१८ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाला प्रतिसाद मिळत असल्याने लाखांचा टप्पा पूर्ण होत आहे. ४ ऑगस्टपर्यंत ५ लाख ९९ हजार २०४ नागरिकांचे लसीकरण मनपाने पूर्ण केले आहे. त्यात ४ लाख २४ हजार १४४ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून १ लाख ७५ हजार ६०० नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. सहा लाखांचा टप्पा ओलांडण्यासाठी ८०० नागरिकांच्या लसीकरणाची गरज होती. गुरुवारी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनच्या लसीकरणामुळे १,९१२ नागरिकांचे लसीकरण झाल्याने महापालिका हद्दीतील ६ लाख १ हजार ११६ नागरिक लसवंत झाले आहेत. शहरासाठी लसीकरणाचे ११ लाख ७६ हजार ९९९ उद्दिष्ट आहे. त्यापैकी ५ लाख ७७ हजार नागरिकांचे लसीकरण बाकी आहे.
आज लसीकरण बंद: तीन केंद्रांवर कोव्हॅक्सिन मिळणारमनपाला मिळालेले साडेसात हजार लस डोस संपले आहेत. लस पुरवठा होणार नसल्याने शुक्रवारी ६ ऑगस्ट रोजी लसीकरण बंद राहणार असल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे. फक्त कोव्हॅक्सिन लस तीन केंद्रांवर उपलब्ध असेल. क्रांती चौक, राजनगर आणि सिडको एन-४ मधील एमआयटी हॉस्पिटल येथे सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत लसीकरण होणार आहे.