औरंगाबाद : कोविडच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची वाढलेली प्रचंड संख्या आणि रुग्णांच्या उपचारांतील विविध त्रुटीं संदर्भातील ‘लोकमत’सह इतर दैनिकातील बातम्यांची औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. बी यू. देबडवार यांनी सोमवारी (दि. २२) स्वतःहून दखल घेत स्युमोटो याचिका म्हणून दाखल करून घेतली आहे.खंडपीठाने ॲड. सत्यजित बोरा यांची न्यायालयाचे मित्र अमिकस क्युरी म्हणून नियुक्ती केली आहे. ते रीतसर याचिका तयार करून खंडपीठात दाखल करतील. या स्युमोटो याचिकेवर सोमवारी (दि.२६) दुपारी अडीच वाजता ‘ऑनलाईन’ सुनावणी होणार आहे.
शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयातील कोरोनाच्या रुग्णांची वाढती प्रचंड संख्या, मृत्युदर, मृत्यू प्रमाणपत्रासाठी आणि अंत्यविधीसाठी नातेवाइकांची होणारी धावपळ, प्राणवायू आणि रेमडेसिविर इंजेक्शनची कमतरता आणि होणारा काळाबाजार, फसवणूक, गंभीर रुग्ण व त्याचे नातेवाईक यांची आवश्यक त्या वैद्यकीय सोयीसुविधा असलेल्या रुग्णालयातील बेडसाठी होणारी धावपळ, कोविड सेंटरमधील सोयी-सुविधांचा अभाव, डॉक्टर, परिचारिका, सेवक, आदी कोविड योद्धयांना येणाऱ्या अडचणी आणि त्रास, लसीकरण, आदी विविध विषयांवर मागील पंधरवड्यात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची खंडपीठाने दखल घेतली आहे. सरकारतर्फे मुख्य सरकारी वकील डी. आर. काळे काम पाहतील.