औरंगाबाद : कोरोनामुळे कुटुंबेच्या कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. चौराहात राहणाऱ्या मकरिये कुटुंबातील तिघांचा केवळ तीन दिवसांच्या अंतराने मृत्यू झाला असून, याबद्दल प्रचंड हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
कोरोनामुळे सध्या अनेक कुटुंबांवर आघात होत आहे. असाच आघात मकरिये कुटुंबावरही झाला आहे. रामदास लक्ष्मणदास मकरिये (वय ६९) यांचे १९ मे रोजी निधन झाले. या धक्क्यातून सावरायलाही वेळ मिळाला नाही तोच त्यांची पत्नी विमलाबाई मकरिये (६५) यांचे २१ मे रोजी निधन झाले. हे कमी की काय म्हणून सोमवारी सकाळी (दि. २४ मे) सहा वाजता रामदास मकरिये यांचे लहान बंधू नंदकिशोर लक्ष्मण दास मकरिये (५४)यांचे निधन झाले. हे सर्वजण चौराहा येथे एकत्र कुटुंब पद्धतीने राहत होते.
रामदास मकरिये हे १ मे रोजी, विमलाबाई मकरिये या ३ मे रोजी, तर नंदकिशोर मकरिये हे ८ मे रोजी कोरोनाच्या उपचारार्थ डॉ. हेडगेवार हॉस्पिटलमध्ये भरती झाले होते. माजी नगरसेवक व भाजपचे पदाधिकारी अनिल मकरिये यांचे रामदास व नंदकिशोर हे चुलतभाऊ होत.नंदकिशोर मकरिये यांच्या पश्चात तीन मुली व दोन मुले आहेत. त्यापैकी एक मुलगा व एक मुलगी रामदास मकरिये यांनी दत्तक घेतले होते. जुना मोंढा येथे ते तेल भंडार चालवीत असत. नंदकिशोर मकरिये यांच्या पार्थिवावर सकाळी ११ वाजता कैलासनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच कुटुंबातील तिघांचा दिवसाच्या अंतराने अशाप्रकारे मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.