औरंगाबाद : आयआरएस अधिकारी अनंत तांबे यांचा अवघ्या ३२ व्यावर्षी कोरोनामुळे औरंगाबादेत उपचार सुरू असताना सोमवारी मृत्यू झाला. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचे अतिरिक्त खासगी सचिव (एपीएस) म्हणून काम पाहत होते. एक तरुण आयआरएस अधिकारी गमावल्याने एकच हळहळ व्यक्त होत आहे.
शहरातील अमरप्रीत चौक परिसरातील एका खासगी रुग्णालयात २३ एप्रिल रोजी त्यांना दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल झाल्यापासूनच ते ऑक्सिजनवर होते. उपचारासाठी डाॅक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले; परंतु त्यांची प्रकृती खालावत गेली. उपचाराला प्रतिसाद मिळाला नाही. गेल्या ४ दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. डाॅक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली, परंतु उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी १०.५० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती रुग्णालयातर्फे देण्यात आली.
तांबे यांच्या निधनानंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्वीट करीत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. कोरोनामुळे वयाच्या ३२ व्या वर्षी अनंत तांबे यांचे निधन झाले. ते अतिरिक्त पीएस म्हणून काम करत होते. एक तरुण आणि तेजस्वी आयआरएस अधिकारी गमावल्याचे दु:ख आहे. माझ्या प्रार्थना त्यांच्या कुटुंबासोबत असल्याचे प्रकाश जावडेकर यांनी म्हटले.