औरंगाबाद : जिल्ह्यात दोन दिवसांच्या खंडानंतर मंगळवारपासून पुन्हा एकदा कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली; पण लसीकरणाकडे कोरोना योद्ध्यांनी पाठ फिरविल्याचे पाहायला मिळाले. बोलावलेल्या ९६० कोरोना योद्ध्यांपैकी ३४० जणांनी लस घेतली. केवळ ३५ टक्के लसीकरण झाले. त्यातही ग्रामीण भागात केवळ १२ टक्के लसीकरण झाले.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ४ आणि शहरात घाटी तसेच मनपाअंतर्गत ५ खाजगी रुग्णालयांत लसीकरण झाले. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात ५१ टक्के लसीकरण झाले. ॲपमधील अडचणींमुळे ऑनलाइनऐवजी ऑफलाइनच प्रक्रिया राबविण्यात आली. ग्रामीण भागातील केंद्रे अन्य तालुक्यांतील आरोग्य कर्मचाऱ्यांना गैरसोयीची ठरली. या सगळ्यामुळे लसीकरणाला जाण्याचे टाळण्यात आले. परिणामी लसीकरणाच्या प्रमाणात मोठी घट झाली.
दोघांना रिॲक्शन
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये लसीकरणानंतर दोन महिला कर्मचाऱ्यांना रिॲक्शन झाली. एकीला चक्कर आली, दुसऱ्या महिला कर्मचाऱ्याला उलटीचा त्रास झाला. या दोघींनाही मायनर रिॲक्शन असल्याचे मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. नीता पाडळकर यांनी सांगितले. ॲपमध्ये अद्यापही अडचण येत आहे. त्यामुळे लसीकरणाचे मेसेज लाभार्थींपर्यंत जाऊ शकले नाही. फोन करून बोलावण्यात आले; पण अनेक जण आले नाही, त्यामुळे प्रमाण कमी झाले, असेही त्यांनी सांगितले.
याठिकाणी झाले लसीकरण
एमजीएम रुग्णालयात डाॅ. मंजिरी नाईक यांना पहिली लस देण्यात आली. लसीकरणाच्या उद्घाटनप्रसंगी अधिष्ठाता डाॅ. राजेंद्र बोरा, उपअधिष्ठाता डाॅ. प्रवीण सूर्यवंशी, डाॅ. एच. आर. राघवन, डाॅ. बी. के. सोमाणी, डाॅ. शोभा साळवे, डाॅ. राहुल देशमुख आदी उपस्थित होते. डाॅ. हेडगेवार रुग्णालयात पहिली लस डाॅ. अनंत पंढरे यांनी घेतली. यावेळी ‘आयएमए’चे सचिव डाॅ. यशवंत गाडे, डाॅ. सतीश कुलकर्णी, डाॅ. राजेंद्र क्षीरसागर, डाॅ. सीमा पंढरे, डाॅ. जयंत तुपकरी आदी उपस्थित होते. कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये परिचारिका संगीता दाभाडे यांना पहिली लस देण्यात आली. याप्रसंगी विश्वस्त सी. पी. त्रिपाठी, डाॅ. नताशा वर्मा आणि कर्मचारी उपस्थित होते. मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये सेंटर हेड जयेश रमाणी, डॉ. प्रसन्ना देशमुख (प्रथम कोविड लस घेणारे ), डॉ. विजय पठाडे, डॉ. विशाल कुटे, जयदीप रणसिंग, पंकज चौधरी, मनमित होरा, सोनाली कंधारकर आदी उपस्थित होते. घाटीत कक्षसेवक मिलिंद गायकवाड यांना लस देऊन लसीकरणाला प्रारंभ झाला. यावेळी नोडल ऑफिसर डाॅ. जगन्नाथ दीक्षित, डाॅ. स्मिता अंदुरकर, डाॅ. विनोद मुंदडा, डाॅ. चेतन वारे, डाॅ. जगदीश वठार आदी उपस्थित होते.
असे झाले लसीकरण
लसीकरण केंद्र - नियोजन - प्रत्यक्ष लसीकरण
घाटी - ६० १४
वैजापूर - १०० २
सिल्लोड - १०० १२
पाचाेड - १०० ३१
अजिंठा - १०० ४
धूत हॉस्पिटल - १०० ६६
बजाज हॉस्पिटल -१०० ४०
एमजीएम रुग्णालय -१०० ५३
मेडिकव्हर हॉस्पिटल -१०० ५४
डाॅ. हेडगेवार रुग्णालय -१०० ६४
एकूण - ९६० ३४०