औरंगाबाद : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटांत रुग्णसेवेबाबत घाटी रुग्णालय आता अधिक सक्षम झाले आहे. येथील कोरोना रुग्णांसाठी खाटांची संख्या दोनशेवरून एक हजारांवर गेली आहे आणि तीनशेवर व्हेंलिटेलर उपलब्ध आहेत.
कोरोना महामारीची दुसरी लाट ओसरलेली असून पुढे तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णसेवेसाठी आवश्यक ऑक्सिजन आणि मेडिकल गॅस पाईपलाईन यंत्रणेबाबत अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ऑक्सिजन व यंत्रसामग्रीसंबंधित अधिकारी-कर्मचारी, पुरवठाधारक उपस्थित होते. कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी सर्व विभागप्रमुखांनी आपापल्या विभागातील पूर्वतयारी करावी आणि रुग्णांना उत्तमोत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करावा, अशी सूचना डाॅ. येळीकर यांनी यावेळी केली. घाटीत आजपर्यंत १० हजारांपेक्षा जास्त कोविडच्या अतिगंभीर रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.
या वाढल्या सुविधा
कोरोनाच्या प्रारंभी घाटीत कोरोना रुग्णांसाठी २०८ खाटा होत्या. आजघडीला एक हजार खाटांपर्यंत ही क्षमता वाढविण्यात आली आहे. यामध्ये लहान मुलांसाठी ६० खाटा आहेत. ऑक्सिजन क्षमता १० हजार लीटरवरून ५३ हजार लीटर इतकी झाली आहे, तर जम्बो सिलिंडरची संख्या ५०० वरून १,६०० झाली आहे. ऑक्सिजन निर्मितीचे २ प्रकल्प उभारण्यात आले. याचबरोबर रुग्णालयात उपलब्ध असणाऱ्या व्हेंटिलेटरची संख्या ७८ वरून ३०८ झाली आहे.