वैजापूर : परजिल्ह्यातील आलेल्या कोरोनाबाधित रुग्णाचा वैजापूर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. बाधित रुग्णावर उपचार करण्याची परवानगी नसल्यामुळे शासनस्तरावर चौकशीची ससेमिरा लागेल म्हणून त्यांनी नातेवाइकांच्या मदतीने रातोरात मृतदेह रुग्णवाहिकेतून अज्ञातस्थळी रवाना केला. हा घडलेला प्रकार मंगळवारी समोर आला. याबाबत स्थानिक आरोग्य विभागाला कानोकान खबरदेखील नव्हती.
नाशिक जिल्ह्यातील एका कोरोनाबाधित रुग्णास सोमवारी दुपारी कोणतीही प्रशासकीय परवानगी न घेता थेट वैजापुरातील लाडगाव रस्त्यावरील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्या रुग्णाचा रात्रीतून मृत्यू झाला. मृत्यूनंतर रुग्णालय प्रशासन गडबडून गेले. डॉक्टरसह नातेवाइकांनी मृतदेह गावाकडे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णाची नोंद प्रशासकीय स्तरावर करण्यास गेले, तर अनेक प्रकारे चौकशी पाठीमागे लागू शकते. अंत्यसंस्काराला अनेक निर्बंध लागतील. या धास्तीने मृताच्या नातेवाईक रातोरात मृतदेह रुग्णवाहिकेतून घेऊन गेले. यासंदर्भात संबंधित खासगी रुग्णालयाचे प्रमुख डॉ. ईश्वर अग्रवाल यांना विचारणा केली असता, नाशिक जिल्ह्यातून एक रुग्ण उपचारासाठी दाखल झाला. संबंधित रुग्णाला थंडी ताप, दम लागणे आदी लक्षणे होती. उपचार सुरू होताच काही वेळात त्याचा मृत्यू झाला.
स्थानिक प्रशासन गाफील
स्थानिक आरोग्य विभागाला याबाबत कल्पनादेखील नाही. हे नवल आहे. शहरात विनापरवाना पैसे कमविण्याच्या नादात अनेक गंभीर प्रकार घडू लागले आहेत. तरीदेखील कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.