औरंगाबाद : कोरोनाबाधित आणि कोरोनामुक्त रुग्णांची संख्याही आता लाखावर पोहोचली आहे. अनेक गंभीर, अतिगंभीर रुग्णांच्या उपचारात स्टेराइड, रेमडेसिविरसारख्या अनेक औषधांचा मारा झाला. त्यामुळे कोमाॅर्बिडसह कोणत्याही इतर व्याधी नसलेल्या रुग्णांतही साइड इफेक्ट दिसायला सुरुवात झाली आहे. महिन्याकाठी पोस्ट कोविड रुग्णांत गुंतागुंत झाल्याने दहा ते बारा रुग्ण घाटीत भरती होत आहे. त्यामुळे औषधी काळजीपूर्वक घ्या, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
विषाणू संसर्गानंतर कमी झालेल्या प्रतिकारशक्तीमुळे संधिसाधू विषाणू, जीवाणूसह बुरशीजन्य आजार बळावत आहे. यात प्रामुख्याने म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराचेही रुग्ण येत आहे. डोळ्याच्या मागच्या बाजूला ही काळ्या रंगाची बुरशी डोळ्याचे नुकसान करते. त्यामुळे नजर कमी होते. मधुमेह रुग्णांत फार कमी रुग्णांत हा आजार दिसत होता. कोरोनाच्या काळात मधुमेही आणि मधुमेह नसलेल्या रुग्णांतही हे प्रमाण अधिक दिसून येत आहे. स्टेराइडचे साइड इफेक्टही त्याला कारणीभूत आहेत. दुसऱ्या लाटेत हे रुग्ण जास्त दिसताहेत. गेल्या वर्षभरात आतापर्यंत २५ ते ३० रुग्ण असे घाटीत उपचारासाठी आले. सीटी स्कॅनमध्ये त्याचे सायनसमधील अस्तित्व निदान होते. कान, नाक, घसा तज्ज्ञ ती बुरशी काढतात. त्यामुळे रुग्णांनी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवून प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टर नसलेल्यांचेही सल्ले घेतले जातात. त्यामुळे असे टाळावे, असा सल्ला घाटीच्या नेत्ररोग विभागप्रमुख डॉ. वर्षा नांदेडकर यांनीही दिला.
---
रेमडेसिविरचे साइड इफेक्ट
---
रेमडेसिविर इंजेक्शन दिलेल्या कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांत नाडीचे ठोके कमी होणे, रिॲक्शन दिसणे असे साइड इफेक्ट दिसून आले. ते अत्यंत कमी आहेत. यासंदर्भात ॲक्ट १ आणि ॲक्ट २ अशा स्टडी झालेल्या आहेत. त्यात ५३१ पैकी १३१ जणांत साइड इफेक्ट आढळून आले. नाॅर्मल किडनी फंक्शन, जीडीएसआर ३०वर असलेल्या रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन दिले जाते.
प्रत्येकाला त्याचा फायदा होत नाही.
---
स्टेराइडचे साइड इफेक्ट
---
स्टेराइडमुळे रक्तातील साखर वाढणे, प्रतिकारशक्ती कमी झाल्याने संधिसाधू आजार, बुरशी, विषाणू, जीवाणूंची लागण, म्युकरमायकोसिस या बुरशीचा प्रादुर्भाव होणे, रक्तदाब वाढणे, मोतीबिंदूचा धोका, हाडांवर परिमाण होणे असे साइड इफेक्ट कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांत दिसून येत असल्याचे डॉ. सुरवाडे म्हणाले.
---
कोरोनाच नाही कोणताही संसर्ग झाल्यावर डिस्चार्जनंतरही पूर्ण बरे होण्यासाठी १० ते १५ दिवसांचा कालावधी लागतो. कोरोना संसर्गानंतर दम लागणे, थकवा जाणवल्याने रुग्ण येताहेत. मात्र, त्याचे प्रमाण फार नाही. उपचारात स्टेराइड लाइफ सेव्हिंग ड्रग्ज आहे. त्याचा अल्पवापरही झालेला असेल तर साखर नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे आहार चौरस, त्वचेवर थोडावेळ तरी सूर्यप्रकाश पडेल याची काळजी घ्या. किमान काही दिवस तरी जास्त शारीरिक श्रम टाळा.
-डॉ. गजानन सुरवाडे, सहयोगी प्राध्यापक, औषधवैद्यक शास्त्र विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, औरंगाबाद
----
कोरोनाचे रुग्ण वाढले, त्यामुळे सुटी झालेले रुग्ण वाढले. त्यातील बऱ्याच रुग्णांना स्टेराइचे डोस देण्यात आले आहे. हायफ्लो ऑक्सिजन आणि एनआयव्ही लागतो अशा रुग्णांना हे डोस दिले जातात. त्याचे साइड इफेक्ट असतातच. त्यामुळे रक्तातील साखर वाढते. सुटी झाल्यावर सांगितलेला औषधोपचार न घेतल्याने पोस्ट कोविड रुग्णांत स्टेराइडचे साइड इफेक्ट, म्युकरमायकोसिस, थोंबो एम्बोलीझम गॅंगरिन, फटीक, पुन्हा दम लागणे, ऑक्सिजन लागणे असे आजार होऊन घाटीत महिन्याकाठी दहा ते बारा रुग्ण येत आहेत. सुटी झाल्यावरही डॉक्टरांनी दिलेला सल्ला, औषधोपचार नियमित घेणे गरजेचे आहे.
-डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, विभागप्रमुख, औषधवैद्यक शास्त्र विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, औरंगाबाद