औरंगाबाद : कोरोना महामारीने ‘महसूल’ वसुलीला धक्का दिला आहे. १५४ कोटींच्या तुलनेत फक्त ७५ कोटी रुपयांचा महसूल गोळा झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना वसुलीचा टक्का वाढवण्याचे आदेश दिले आहेत. वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण न झाल्यास कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
१ एप्रिल २०२० पासून आर्थिक वर्ष सुरू झाले, परंतु सुरुवातीचे सहा महिने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमध्ये गेले. उर्वरित सहा महिन्यात जिल्ह्याचे दैनंदिन जीवन सुरळीत करण्यात गेले. त्यामुळे वसुलीकडे दुर्लक्ष होत गेले. परिणामी प्रशासनासमोर आता वसुलीचे उद्दिष्ट कसे पूर्ण करायचे असा प्रश्न आहे. जिल्ह्यात शेतसारामधून ४२ कोटी ३५ लाखांपैकी २० कोटी ६ लाख रुपयांची वसुली झाली आहे. गौण खनिजातून ५५ कोटी ५५ लाखांपैकी फक्त १७ कोटी ६ लाख प्रशासनाच्या तिजोरीत आले आहेत. महसूल वसुलीत फुलंब्री आणि सोयगाव तालुके आघाडीवर आहेत. तर औरंगाबाद शहर, पैठण, गंगापूर, वैजापूर तालुके मागे आहेत. ६ वाळू पट्ट्यांचे लिलाव पूर्ण झाले आहेत. १० पट्ट्यांवर पर्यावरण समितीने बंदी आणली आहे. उर्वरित १० पैकी ६ पट्ट्यांचे लिलाव झाले, त्यातील ४ पट्टे वाळूउपसा करण्यासाठी दिले आहेत.