मुजीब देवणीकर
औरंगाबाद : कोरोनावर उपचार घेण्यासाठी शहरात मराठवाडा आणि इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात रुग्ण येत आहेत. रुग्ण दगावल्यानंतर मृतदेह नातेवाइकांकडे न देता, शहरातच शासकीय यंत्रणेने अंत्यसंस्कार करण्याचा नियम आहे. या नियमाला धाब्यावर बसवून मागील काही दिवसांपासून अंत्यसंस्कारासाठी नेमलेल्या खासगी संस्था मृतदेह थेट नातेवाइकांच्या गावी नेऊन पोहोचवत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मृतदेह घरापर्यंत नेण्यासाठी तब्बल ३० हजार रुपयांपर्यंतची वसुली केली जात आहे.
महामारीच्या संकटाला तोंड देताना, अनेक संस्था, औद्योगिक संघटना मोलाची मदत करत आहेत. मात्र, काही नागरिक आजही कोरोनाची संधी साधत पैसे कमविण्यात मग्न आहेत. महापालिकेने मागील वर्षी कोरोनाने मरण पावलेल्या नागरिकांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी दोन वेगवेगळ्या संस्था नियुक्त केल्या आहेत. एका संस्था मोफत सेवा करीत आहे. दुसऱ्या संस्थेला मनपाकडून एका मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी अडीच हजार रुपये देण्यात येत आहेत. राज्याच्या कोणत्याही भागातील रुग्णांना औरंगाबाद शहरातील रुग्णालयात मरण पावला असेल, तर मृतदेह शहराबाहेर नेण्याची परवानगी नाही. शहरातील स्मशानभूमी किंवा कब्रस्तानात दफनविधी करण्याचे आदेश आहेत. मात्र, या नियमाला बगल देत, मोफत अंत्यसंस्कार करणाऱ्या संस्थेकडून थेट मृतदेह जिल्ह्याबाहेर संबंधितांच्या गावाला नेण्यात येत आहेत. मृतदेह नेण्यासाठी नातेवाइकांकडून ३० हजार रुपये उकळण्यात येत असल्याची तक्रार पंचशील महिला बचत गटाने महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे केली आहे, याशिवाय अनेक मृतदेह शहराबाहेर नेऊन नातेवाइकांकडे स्वाधीन करण्यात येत आहेत. नातेवाईक सर्व धार्मिक विधी करून अंत्यसंस्कार गावात करतात. या तक्रारीची साधी चौकशीही महापालिका प्रशासनाने केलेली नाही हे विशेष.
केस -१
१२ मे रोजी गजानन महाराज मंदिर परिसरातील एका खासगी रुग्णालय बीड जिल्ह्यातील रुग्णाचा मृत्यू झाला. महापालिकेने नियुक्त केलेल्या एका संस्थेने मृतदेह बीड जिल्ह्यात नेऊन पोहोचवला. यासाठी संबंधित संस्थेने तीस हजार रुपये नातेवाइकांकडून घेतल्याचा आरोप आहे.
केेस -२
सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथील एका कोरोना रुग्णाचा घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. हा मृतदेहही १० मे रोजी नातेवाइकांकडे गावात नेऊन स्वाधीन करण्यात आला. नातेवाइकांनी सर्व विधी करून कब्रस्तानात दफन विधी केला.
चौकट...
कोरोना पसरण्याची दाट भीती
शासनाने कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्वतंत्र संस्था नेमण्याचे आदेश दिलेले आहेत. नातेवाइकांना मृतदेह न देण्याचे एकमेव कारण म्हणजे कोरोनाचा संसर्ग होऊ नये, हा आहे. मागील १४ महिन्यांमध्ये महापालिकेने अंत्यसंस्कारांवर जवळपास एक कोटी रुपये खर्च केले आहेत.
तक्रार अर्ज प्राप्त झालेला आहे
महापालिकेने नियुक्त केलेल्या संस्थेकडून मृतदेह शहराबाहेर देण्यात येत असल्याची तक्रार दुसऱ्या एका संस्थेने आरोग्य विभागाकडे केलेली आहे. या संदर्भात पडताळणी करण्याचे काम सध्या सुरू आहे.
डॉ.नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा