सोपान कोठाळे
केळगाव : गेल्या वर्षी कोरोनाचे भयानक सावट आल्याने अनेकाचे शुभमंगल थांबले. या वर्षी आपले हात पिवळे होतील, या आशेने वर-वधुंच्या इच्छेला मात्र यंदाही कोरोनाचा अडसर ठरत आहे. त्यामुळे लग्नसराईवर कोरोनाचे संकट ओढावले आहे.
दरवर्षी होणाऱ्या लग्न सोहळ्यापेक्षा यंदा होणारे विवाह सोहळे कोरोनामुळे खूप कमी झाले आहेत. त्यामुळे लग्नतिथीवर त्याचा परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे लग्न कार्यावर अवलंबून असलेले व्यवसायधारकांनाही फटका बसू लागला आहे. विवाह म्हटला की, त्यासाठी आवश्यक असणाऱ्या गहू, डाळी, साखर, तांदूळ, भांडी, साहित्याची मोठ्या प्रमाणात जुळवाजुळव करावी लागते. त्यात वधू-वर पित्यांची चांगलीच धांदल उडते. शेतकरी असलेल्या वधुपित्यांना त्यांच्या शेतमालाला भाव नाही मिळाला, तर आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते. त्यामुळे याचा परिणाम बाजारपेठेवर अर्थात खरेदीवरही होतो. यंदा मार्च ते जून महिन्याच्या काळात लग्नतिथी मोठ्या प्रमाणात आहेत, परंतु कोरोनाचे संकट आणखी किती दिवस राहणार आहे, हे परिस्थितीच ठरवेल.
पालकांचा झाला हिरमोड
यंदा अतिवृष्टीने काही भागांतील शेतकऱ्यांचे नुकसान झाले, तरीही रब्बी पिकांच्या उत्पादनातून मुला-मुलीचे लग्न धूमधडाक्यात करण्याची इच्छा पालकांमध्ये होती. मात्र, कोरोना मागील वर्षीप्रमाणे यंदाही डोक्यावर येऊन बसल्याने, शासनाकडून लग्नकार्यावर निर्बंध लावण्यात आले. त्यामुळे घरातल्या घरात आणि पाच पंचवीस लोकांच्या उपस्थितीत लग्नकार्य उरकावा लागत आहे. त्यामुळे वधु-वर पित्यांचा हिरमोड झाला आहे.
समाज माध्यमातून निमंत्रण
गेल्या अनेक वर्षांपासून विवाह सोहळ्याच्या लग्नपत्रिका लोकांपर्यंत पोहोचविण्याची प्रथा आहे. मात्र, कोरोना महामारीमुळे या प्रथेला लगाम लागला आहे. लग्नपत्रिका न मिळाल्याने होणारे नातेवाइकांचे रुसवे-फुगवे आता विसावले आहेत. निमंत्रण देण्यासाठी आता व्हॉट्सअप, फेसबुकसारख्या सामाजिक माध्यमांचा वापर होऊ लागला आहे.