औरंगाबाद : दररोज दोनशेच्या संख्येने वाढणाऱ्या 'कोरोना'ला रोखण्यासाठी महापालिका हद्दीत १० ते १९ जुलैपर्यंत अत्यंत कडक संचारबंदी लावण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
२ ते ९ जुलैपर्यंत शहरातील वाढती रुग्णसंख्या, नागरिक नियमांचे किती पालन करतात यावर प्रशासनाचे बारीक लक्ष असणार आहे. या काळात परिस्थितीत सुधारणा झाल्यास संचारबंदी बाबत पुन्हा विचार केला जाऊ शकतो. मात्र, परिस्थिती सुधारली नाही तर १० पासून संचारबंदी लावण्यात येईल. बुधवारी एका बैठकीत हा निर्णय झाला. या काळात कोणतेही कारण देऊन नागरिकांना बाहेर पडता येणार नाही. शहरात राहणाऱ्या एमआयडीसीच्या कामगारांना पास उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
आता नाही तर कधीच नाहीकोरोना आजाराची साखळी तोडण्याची संधी प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात येत आहे. औरंगाबादकरांनी या उपक्रमाला १०० % साथ दिली तर कोरोना प्रसाराची साखळी सहज तोडता येईल असा विश्वास सूत्रांनी व्यक्त केला. आता नाही केले तर नंतर कधीच नाही असेही सूत्रांनी नमूद केले.
काय राहणार उघडे,काय बंद ?मेडिकल आणि दुधाची दुकाने काही तास उघडी ठेवण्यात येणार आहेत . किराणा दुकान उघडी ठेवण्यावर अधिकाऱ्यांचे एकमत झाले नाही. काही अधिकाऱ्यांनी एकदिवस आड काही तास किराणा दुकान सुरू ठेवण्याचा सल्ला दिला आहे. आठही दिवस किराणा दुकान बंद करण्याचा विचार सुरू आहे.
४ जुलैपासून वाळूज परिसरात संचारबंदी४ जुलैपासून वाळूज औद्योगिक वसाहत आणि परिसरात कडक संचारबंदी लावण्यात येणार आहे. १ जूनपासून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बाधित आढळून येत आहेत. बजाजनगर आणि आसपासच्या भागात रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी संचारबंदी शिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही.