औरंगाबाद : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मराठवाड्यातील प्रशासकीय यंत्रणा मेटाकुटीला आली आहे. त्यातच हिंगोलीतील जिल्हाधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने यंत्रणा हवालदिल झाली असून, आरोग्य सुविधांसह मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे प्रशासकीय यंत्रणेसमोर आव्हान उभे आहे.
विभागात २९ हजार पेक्षा अधिक कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे. लातूरमध्ये सध्या लॉकडाऊन सुरू आहे, तर बीड जिल्ह्यात उद्यापासून लॉकडाऊन लागू होणार आहे. तसेच हिंगोली, परभणी, उस्मानाबाद जिल्ह्यांत कोरोना हातपाय पसरतो आहे. खाजगी हॉस्पिटल्स स्थानिक प्रशासनाला सहकार्य करण्यास तयार नाहीत. डॉक्टर्स स्वेच्छा निवृती मिळावी, यासाठी अर्ज करू लागले आहेत. औषधींचा तुटवडा जाणवू लागला आहे. उस्मानाबादमध्ये डॉक्टर्स नाहीत. घाटीतून काही डॉक्टरांची टीम मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पाठविण्यात आली आहे. यासारखी अनेक प्रकरणे असून, प्रशासन हवालदिल होत चालले आहे. लोकप्रतिनिधी विभागीय प्रशासनाकडे लॉकडाऊन करण्याबाबत मागणी करीत आहेत; परंतु कोरोनावर लॉकडाऊन, संचारबंदी हा उपाय नसल्यामुळे प्रशासनाने लॉकडाऊनबाबत ठोस निर्णय घेतलेला नाही. चेकपोस्टवरून रोज १०० च्या आसपास नागरिक येत आहेत. त्यातील पॉझिटिव्ह रुग्ण कोरोना प्रसारक आहेत. सहा महिन्यांपासून आरोग्य यंत्रणेसह सर्व प्रशासकीय यंत्रणा कोरोना नियंत्रणाच्या कामात आहे.
अँटिजन कीटस्चा तुटवडाकंटेन्मेंट झोनमध्ये टेस्टिंंग वाढविण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या; परंतु अँटिजन टेस्ट कीटस्चा तुटवडा निर्माण झाला आहे. कीटसचा पुरवठा लवकरच होईल. जिल्हानिहाय कीटस पुरवठ्याबाबत वरिष्ठ पातळीवर बोलणी सुरू आहे, असा दावा प्रशासनाने केला.
विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सांगितले, हिंगोली, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणीचा आढावा घेतला आहे. उपलब्ध सुविधांच्या तुलनेत विभागातील यंत्रणेने प्रचंड परिश्रम घेत कोरोनाशी दोन हात केले आहेत. पूर्ण विभागाचा आढावा घेतला असून, खाजगी हॉस्पिटल्सशीदेखील बोलणे सुरू आहे.