संतोष हिरेमठ
औरंगाबाद : ती आजी, आई, बहीण, पत्नी, मुलगी कुणीही असू शकते. संसाराचा गाडा ओढताना महिलांना बऱ्याच आरोग्यविषयक तक्रारी निर्माण होतात; पण तिचा स्वभाव अनुवंशिक म्हणा ना. नेहमी चालढकल करणारा, कोरोनासारख्या महाभयंकर महामारीतही महिलांनी दुखणे अंगावर काढल्याची चिंताजनक स्थिती आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णसंख्येत महिलांचे प्रमाण अवघे ३७ टक्के असल्याचे समोर आले आहे.
घरातील सर्वांची काळजी घेणारी, परंतु स्वत:ची वेळ आली की दुर्लक्ष करणारी, स्वत:च्या आरोग्याविषयी कानाडोळा करणारी स्त्री बहुधा प्रत्येकच घरात बघायला मिळते. कुठे कुटुंबीय, तर कुठे स्वत: महिलाच स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत आहे. ‘मी दवाखान्यात गेले, आजारी पडले तर कुटुंबाचे काय..’ असा विचार ती करते. जिल्ह्यात मागील १७ महिन्यांत १ लाख ४८ हजार कोरोना रुग्ण आढळून आले. या एकूण रुग्णसंख्येत महिलांचे प्रमाण अत्यल्प आहे. पुरुषांचे प्रमाण अधिक आहे. कोरोना प्रादुर्भावात साधी शिंक आली तरी पुरुष मंडळी कोरोना तपासणीसाठी धाव घेत होते. परंतु काहीही झाले नाही म्हणत ताप, खोकला असा त्रास महिलांनी सहन करीत महिलांनी उपचार टाळल्याची शक्यता दिसत आहे. लहान मुलांच्या बाबतीत पालक अधिक संवेदनशील पाहायला मिळाले. मुलांमध्ये कोणतीही लक्षणे दिसली की आधी रुग्णालयात जाण्यास प्राधान्य देण्यात आला. परंतु, ही स्थिती महिलांच्या बाबतीत पाहायला मिळाली नाही.
पुरुषांचे घराबाहेर जाण्याचे प्रमाण अधिक
कोरोनाबाधितांत महिलांचे प्रमाण कमी आहे. पुरुषांचे घराबाहेर जाण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे कोरोनाबाधित होण्यात पुरुषांचे प्रमाण अधिक असू शकते. परंतु, महिलांचे प्रमाण कमी आणि पुरुषांचे प्रमाण अधिक, यासाठी शास्त्रीय कारण नाही. महिलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष, असेही काही कारण असणार नाही.
- डाॅ. पारस मंडलेचा, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा
---
महिलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष
महिला सहसा घराबाहेर पडत नाही. चूल आणि मूल अशीच स्थिती असते. आजही वंशाचा दिवा म्हणून मुलाकडे पाहिले जाते. शिवाय घराबाहेर पुरुषच अधिक असतात. या सगळ्यात महिलांच्या आरोग्याकडे काहीसे दुर्लक्ष होते, तर पुरुष आजारी पडला तर तत्काळ रुग्णालयात जाण्यास प्राधान्य दिले जाते.
- डाॅ. सुधाकर शेळके, जिल्हा आरोग्य अधिकारी
-------
जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या
- पुरुष : ९३, ५६६
-महिला : ५४, ९६५
एकूण : १,४८, ५३१
----
ग्रामीण भागातील कोरोना रुग्ण
- पुरुष : ३९,५९९
- महिला : २१,१८४
एकूण : ६०,७८३
------
शहरातील कोरोना रुग्ण
- पुरुष : ५३,९६७
- महिला : ३३,७८१
एकूण : ८७,७४८